ठाणे : सुप्रसिद्ध लेखक,कादंबरीकार व अख्या महाराष्ट्राला विनोदाच्या माध्यमातून हसवणारे व्यक्तिमत्व म्हणजे पूल देशपांडे होय.पुलंच्या जन्मशताब्दी निमित्त अभिनय कट्टा येथे "आठवण पुलंची" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यात अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी पुलंच्या साहित्यावर आधारित अभिवाचन केले.व यावेळी विविध एकपात्री,द्विपात्री देखील सादर करण्यात आल्या.
पुल या साहित्यिकाची ओळख नाही असा एकही व्यक्ती आपणास शोधून सापडणार नाही.मराठी साहित्यात त्यांनी इतिहास घडवला असून त्यांनी नाट्य व साहित्य क्षेत्रात दिलेले योगदान विसरणे शक्य नाही. यावेळी सहदेव कोळंबकर, कुंदन भोसले,कुणाल पगारे यांनी असा मी असा मी या पस्तकातील सखाराम गटणे या पात्रावर अधारित एक लघुनाट्य सादर केले.ओमकार मराठे व शुभम कदम यांनी वरात या कथेतील दारू या प्रसंगावर सादरीकरण केले. शुभांगी भालेकर यांनी कावळा या विषयावर अभिवाचन केले. सौरभ मुळे याने गणगोत या पुस्तकातील रावसाहेब या कथेचे अभिवाचन केले. सौरभने उत्तमरीत्या सादरीकरण करत उपस्थित रसिकांची मने जिंकली.वैभव पवार याने गणगोत पुस्तकातील दिनेश हि कथा सादर केली.वैभव चव्हाण याने अंतुबर्वा हे पत्र वाचन करत जिवंत केले.साक्षी महाडिक हिने आयुष्य या पूल लिखित कवितेचे वाचन केले. प्रथमेश मंडलिक याने "एकच प्याला" हि एकपात्री सादर केली. अनिल बोतालजी यांनी मिमिक्री सादर करत रसिकांची मने जिंकली. यावेळी कट्ट्याचे निवेदन राजन मयेकर यांनी केले.दीपप्रज्वलन जेष्ठ प्रेक्षक अल्का वढावकार यांनी केले. अल्काताई यांनी पु. ल. यांच्या कविता सादर केल्या. पु. ल. देशपांडे हे खरंच साहित्य क्षेत्रातील भाई होते असे अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी सांगितले. आणि इथून पुढे अभिनय कट्याच्या वाचक कट्टयावर वर्षभर किमान अर्धा तास पुलंचे साहित्य वाचले जाईल असे सांगितले.