- अजित मांडकेठाणे - कळवा खाडीत उभ्या असलेल्या अनाधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिका पुन्हा एकदा जागी झाल्याचे दिसून आले. त्यानुसार गुरुवारी सकाळी नऊ वाजल्यापासून कळवा खाडीतील क्रांती नगर भागात असलेल्या सुमारे ६० हून अधिक झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. परंतु या कारवाईला येथील स्थानिकांनी विरोध करीत रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल ओतून घेण्याचाही प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांचे हे प्रयत्न हानून पाडल्याने महापालिकेने ही कारवाई सफल केल्याचे दिसून आले.
ठाणे शहराला सुंदर खाडी किनारा लाभला आहे. परंतु याच खाडीत, मागील कित्येक वर्षापासून ठाण्याच्या दिशेने तसेच कळव्याच्या दिशेने असलेल्या बाजूने खाडीतच झोपड्या बांधल्याचे चित्र दिसून आले आहे. मधल्या काळात याची संख्या वाढली होती. या संदर्भात वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून कारवाई देखील केली गेली. मात्र पुन्हा नव्याने या भागात झोपड्या उभ्या राहतांना दिसून आल्या आहेत. त्यात काही दिवसांपासून याठिकाणी झोपड्यांचे रुपांतर पक्क्या बांधकामात होऊन तळ अधिक एक मजल्यापर्यंत याठिकाणी महापालिकेच्या नाकावर टिच्चुन घरे उभी राहण्यास सुरवात झाली. या संदर्भात प्रफुल वाघुले यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून टिका केल्यानंतर महापालिकेला पुन्हा एकदा जाग आली आहे.
त्यानुसार गुरुवारी सकाळी ९ वाजता खडबडून जागे झालेल्या नौपाडा प्रभाग समितीच्या माध्यमातून नौपाडा प्रभाग समिती हद्दीत येणाºया क्रांती नगर भागातील झोपड्यांवर कारवाई करण्यास सुरवात केली. परंतु या कारवाईला विरोध करीत येथील रहिवाशांना रस्ता रोको केला. तसेच महापालिकेच्या विरोधात आंदोलन देखील केले. शिवाय काहींनी अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्नही केला. परंतु पोलिसांनी त्यांचे हे प्रयत्न वेळीच रोखल्याने पालिकेने येथील ६० हून अधिक झोपड्यांवर कारवाई केली. त्यातही यातील काही झोपड्या या मागील २० ते २५ वर्षापासून येथे असल्याने त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
कळवा खाडीतील ही अनाधिकृत बांधकामे देखील तीन प्रभाग समिती हद्दीत मोडत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार गुरुवारी नौपाडा प्रभाग समितीने कारवाई केली. आता कळवा आणि उथळसर प्रभाग समिती शिल्लक झोपड्यांवर कारवाई करणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.