ठाणे : मुंंब्रा, डायघर आणि नारपोली भागातील गावठी दारुच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी गुरुवारी दिवसभर धाडसत्र राबविले. या धाडीत दारु निर्मितीसाठी लागणा-या रसायनासह सहा लाख ६० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे, ठाण्याचे अधीक्षक एन. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी विभागाचे निरीक्षक महेश बोज्जावार, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील तसेच भरारी पथकाचे निरीक्षक संजय कांगणे, उपनिरीक्षक सुनिल देशमुख आणि अजय बागाटे यांच्या पथकाने ७ डिसेंबर रोजी आलीमघर तसेच खर्डी ते आगासन दरम्यान असलेल्या खाडी किनारी भागात गावठी हातभट्टीवरील दारु निर्मितीच्या सहा अड्डयांवर कारवाई केली.
यामध्ये रसायनाने भरलेले २०० लीटर क्षमतेचे १५३ प्लास्टीकचे ड्रम, २०० लीटर क्षमतेचे रिकामे १६ प्लास्टीकचे ड्रम, रसायनाने भरलेले दोन मोठे ढोल तसेच ३१ हजार २०० लीटर दारु निर्मितीचे रसायन असा सहा लाख ६० हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त करुन नाश केल्याची माहिती अधीक्षक नाना पाटील यांनी दिली. धाडीची चाहूल लागताच खाडी परिसरातून दारु निर्मिती करणाºयांनी पलायन केले. याप्रकरणी मुंब्रा, डायघर आणि नारपोली या तीन पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कारवाई सुरुच राहणार- नाना पाटीलगेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीर गावठी दारु निर्मितीच्या अड्डयांवर खाडी तसेच जंगल परिसरात सुरु असलेली राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही कारवाई अधिक तीव्र करणार असल्याचे ठाण्याचे अधीक्षक नाना पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये होत असलेल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर मद्य विक्री मोठया प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विक्रीला तसेच निर्मितीला पायबंद घालण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.