- अजित मांडके ठाणे - कळवा विधानसभा क्षेत्रात घरोघरी कॅलेन्डरच्या माध्यमातून पोहचल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आता येथील महिला मतदारांना आर्कषित करण्यासाठी त्यांच्यासाठी मकरसंक्रातीच्या निमित्ताने १३ जानेवारी रोजी होम मिनिस्टर सन्मान महिलांचा, खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली आहे. त्यामुळे एक प्रकारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना एकप्रकारे आव्हान देण्याचेच काम अजित पवार गटाने सुरु केले आहे.
राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर ठाण्यात जितेंद्र आव्हाड विरुध्द नजीब मुल्ला, आनंद परांजपे यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैºया झाडल्या आहेत. त्यात नजीब मुल्ला यांनी मुंब्रा - कळवा या विधानसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत करीत आव्हाडांना डॅमेज करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. तिकडे आव्हाडांनी केलेल्या कामांवरच या निवडणुकीत मते मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु अजित पवार गट या पट्यात आव्हाडांनी घेरण्याचा एकही प्रयत्न सोडत नाही. नव्या वर्षाच्या निमित्ताने येथील तब्बल ५० हजार घरात अजित पवार गटाने कॅलेन्डर पोहचवत आपले ब्रॅडींग करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आता येथील महिला मतदारांना आर्कषित करण्यासाठी नवी शक्कल लढविण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मकरसंक्रातीच्या निमित्ताने कळवा, मुंब्रा भागातील महिलांसाठी होम मिनिस्टर सन्मान महिलांचा, खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत. ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्याक विभाग निरिक्षक नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणे राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सौ वनिताताई गोतपागर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन, शनिवारी, १३ जानेवारी रोजी, करण्यात आले आहे. मानाच्या पैठण्या, सोन्याची नथ, मोत्याचा तनमणी, चांदीचे पैंजण, ५० लकी ड्रा बक्षीसे, प्रत्येक सहभागी महिलेला आकर्षक भेटवस्तू आदी स्वरूपात या खेळात बक्षिसांचा वर्षाव करण्यात येणार आहे.
१३ जानेवारी २०२४ रोजी, सायंकाळी ४ ते रात्री १० वाजता, खारलॅण्ड मैदान, एसव्हीपीएम शाळेसमोर, दत्तवाडी, कळवा, पश्चिम येथे, 'येथे आयोजित करण्यात आला आहे. एकूणच महिलांना पैठणी बरोबर नथ आणि इतर आर्कषिक बक्षिस देऊन त्यांना आपल्याकडे आर्कषित करण्याचा अजित पवार गटाचा फंडा कितपत यशस्वी होतो हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.