ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. १ - मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवताना पकडल्यानंतर पोलिसांनी दंड भरायला सांगितला म्हणून संतापलेल्या एका मद्यपीने स्वत:ची नवी कोरी अॅव्हेन्जर बाईक पेटवून दिल्याची घटना ठाण्यामध्ये घडली आहे.
अशोक ओवळ अस या मद्यपीच नाव असून, त्याने स्वत:ची बाईक पेटवलीच पण सोबत तीन अन्य बाईकचेही नुकसान केले. नववर्षाचे स्वागत करताना ड्रंक अँड ड्राईव्हमुळे कुठे अपघात होऊ नयेत यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी महत्वाच्या रस्त्यांवर चोख बंदोबस्त ठेवला होता.
रात्री ११.३० च्या सुमारास अशोक ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून आपल्या अॅव्हेन्जर बाईकवरुन चालला असताना वाहतूक पोलिसांनी त्याला थांबवून त्याची चाचणी केली. त्यावेळी त्याने मद्यपान केल्याचे आढळून आले.
पोलिसांनी त्याची बाईक ताब्यात घेऊन त्याला दंडाची रक्कम भरण्यास सांगितले. पण अशोकने दंडाची रक्कम भरण्याऐवजी माचिसने आपल्या बाईकची पेट्रोल टाकी पेटवून दिली. यामध्ये अशोकची बाईक जळून खाक झालीच पण सोबत वाहतूक पोलिसांनी कारवाई करुन ताब्यात घेतलेल्या तीन बाईक्सही जळाल्या. या घटनेनंतर अशोक ओवळला ताब्यात घेऊन नौपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.