जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: पतंप्रधान नरेंद मोदी यांच्यामुळे जगभरातील भक्तांचे सप्न पूर्णत्वास जात आहे. संपूर्ण देशात राम मंदीराबाबत उत्स्कूता असून देश राममय झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात केले. मंदिर उभारणीसाठी ठाण्यातून एक चांदीची वीट आनंद दिघे यांनी पाठविली होती. त्यामुळे ठाणे आणि आयोध्येचे वेगळेच नाते आहे. राम मंदीर बनवणार पण, तारीख सांगणार नाही, असे काही लोक म्हणायचे. परंतू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदीरही उभारले आणि तारीखही सांगितली, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.
ठाण्यातील गडकरी रंगायतन ते कौपिनेश्वर मंदिर मार्गादरम्यान श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रा रविवारी दुपारी काढली होती. यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप तसेच शिंदें गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांसह विश्व हिंदू परिषद, आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. लेझीम, ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या यात्रेत श्री राम जय जय रामची घोषणाबाजी सुरू होती. यात्रेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. या मार्गावरील वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. यात्रेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आयोध्येत राम मंदीर व्हावे, अशी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती आणि ठाण्यात आलेल्या कारसेवा यात्रेत दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी चांदीची विट देऊन ती आयोध्येला पाठविली होती. त्यामुळेच ठाण्याचे आणि आयोध्याचे एक जुने नाते आहे. राम मंदीर हा विषय अस्मिता, श्रद्धेचा आहेच पण, त्याचबरोबर देशाचा अभिमानही आहे. पतंप्रधान मोदी यांच्यामुळे भव्य राम मंदिर तयार झाले. हे मंदीर २२ जानेवारीला रामभक्तांसाठी खुले होणार आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण देशात उत्साह आणि उत्सुकता असल्याचेही ते म्हणाले. विश्व हिदू परिषदेचे सहमंत्री राजेंद्र पवार यांनीही मार्गदर्शन केले.१ ते १० जानेवारी दरम्यान प्रत्येक वस्तीत आणि घरात अक्षतांच्या वाटपाने आयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी आमदार प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश म्हस्के,विश्व हिदू परिषदेचे सहमंत्री राजेंद्र पवार, कौपिनेश्वर मंदिर ट्रस्टचे पदाधिकारीही उपस्थित होते.
ठाण्यात कलशाचे पूजन
आयोध्येहून आणलेल्या कलशाचे तसेच अक्षतांचे ठाण्यात मिरवणूकीनंतर पूजन झाले. याच अक्षता आता घराेघरी निमंत्रणासाठी वाटप केल्या जाणार आहेत.