ठाणे - ठाणे आणि कल्याण हे भाजपाचा बालेकिल्ला आहे. त्यादृष्टीने भाजपाची आणखी ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राममंदिराच्या मुद्द्यावर शिवसेनेला भाजपाचे समर्थन असल्याचे स्पष्ट करीत समविचारी पक्षाना एकत्र घेऊन आगामी निवडणूक लढविणार असल्याचे सांगत शिवसेनेशी राज्यात युती कायम ठेवणार असल्याचे संकेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले.
ठाणे आणि भिवंडी लोकसभा मतदार संघांचा आढावा घेण्यासाठी दानवे ठाण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी ही माहिती दिली. भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, भिवंडीचे खासदार कपिल पाटील, ठाण्याचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात आपण गेल्या 15 दिवसांपासून दौऱ्यावर आहे. यातील 13 मतदारसंघ झाले असून बुधवारी तीन ठिकाणचा दौरा करणार असल्याचे ते म्हणाले. समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव द्यायचे यावरून जो वाद सुरू आहे, त्यावर दोन्ही पक्षातील नेते चर्चेतून योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला आहे.