ठाणे : चहा ठेवलेला गॅस चालूच राहिल्यामुळे आई १४ वर्षीय मुलाला रागावली. याचा राग आल्याने घरातून तीन दिवसांपूर्वी नाराजीने बेपत्ता झालेला हा अल्पवयीन मुलगा थेट मुंबईतील माटुंगा भागातील त्याच्या आजोबांकडे गुरुवारी दुपारी आला. आपला मुलगा सुखरूप मिळाल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कळव्यातील न्यू शिवाजीनगर भागात राहणारा हा आठवीत शिकणारा एक मुलगा २१ मार्चला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास खासगी क्लासला जातो, असे सांगून घराबाहेर पडला. तो उशिरापर्यंत घरी परतलाच नाही. तो क्लासलाही गेलेला नव्हता. सर्वत्र शोध घेऊनही तो न मिळाल्याने अखेर याप्रकरणी त्याच्या पालकांनी २२ मार्चला त्याच्या अपहरणाची तक्रार कळवा पोलिस ठाण्यात दाखल केली. कळवा पोलिसांनी या मुलाचा शोध सुरू केला असतानाच २३ मार्चला तो थेट माटुंग्यातील त्याच्या आजोबांकडे (आईच्या वडिलांकडे) दाखल झाला. मधल्या काळात तो कुठे होता? माटुंग्याला तो कसा गेला? याची त्याने काहीच माहिती दिली नाही. आपण स्वत:च घराबाहेर पडल्याचे त्याने कुटुंबीयांना सांगितले. नाराज मुलगा पुन्हा सुखरूप मिळाल्यामुळे त्याच्या आईसह कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकत आनंद व्यक्त केला.