ठाणे : केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठाणे शिवसेनेने हात पुढे केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या ठाणे जिल्हा शाखेने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे यांच्यासह ५० डॉक्टरांचे पथक कपडे, चादरी, साबण, तांदूळ, डाळ, साखर, बिस्कीट पुडे आदी वस्तूंचा समावेश असलेले सुमारे ५० टन सामान घेऊन केरळच्या दिशेने गुरुवारी सायंकाळी रवाना झाले. सुमारे १० हजार नागरिकांना याचा लाभ होईल, अशी आशाही यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. यापाठोपाठ जशी गरज भासेल, तशी टप्प्याटप्प्याने मदत दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदारांनी यापूर्वीच केरळच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. शिंदे यांनी गुरु वारी ठाण्यात केरळला निघालेल्या सामानाच्या ट्रक्सना हिरवा झेंडा दाखवला. याप्रसंगी खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, महापौर मीनाक्षी शिंदे, जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, उपमहापौर रमाकांत मढवी, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, शहरप्रमुख रमेश वैती आणि अन्य पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसेनेच्या ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने विविध प्रकारची मदत सामग्री केरळला पाठवण्यात येत आहे. ५० डॉक्टरांचे एक पथकही केरळला जात असून मी स्वत: आणि खा.डॉ. श्रीकांत शिंदे या पथकासोबत जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. दिनकर देसाई, डॉ. जे.बी. भोर यांच्या नेतृत्वाखाली इंडियन मेडिकल असोसिएशन आणि वागळे इस्टेट डॉक्टर्स असोसिएशन यांच्यासह डॉक्टरांच्या विविध संघटनांचे सदस्य या पथकात सहभागी होत आहेत. केरळमध्ये विविध ठिकाणी वैद्यकीय मदतकेंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. पुराचा जोर ओसरल्यानंतर आता साथीचे आजार पसरण्याची भीती असल्यामुळे वैद्यकीय मदतीची मोठी आवश्यकता आहे. तसेच, तांदूळ, डाळ, साखर, डेटॉल, साबण, कपडे आदींचीही गरज असून ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने ५० टन सामग्री पाठवण्यात येत असून ती आल्लीप्पाला येथे रवाना होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.पूरग्रस्त कु त्री-मांजरांसह जनावरांच्या मदतीसाठी ठाणेकरांचा पुढाकारकेरळमधील पूरग्रस्तांना सर्वच स्तरांतून मोठ्या प्रमाणात मदतीचे हात पुढे येत आहेत. त्यातच, ठाण्यातील पशुपक्ष्यांसाठी काम करणाऱ्या ‘एसपीसीए’ या सामाजिक संस्थेसह आवाज आणि रॉ या दोन संस्था धावून आल्या आहेत. त्यांनी केरळ रहिवाशांसह प्राण्यांसाठी अन्नधान्यासह औषधांनी भरलेला एक ट्रक ठाण्यातून रवाना केला आहे.तसेच त्यांच्यासोबत सुमारे १५ जणांचे एक पथकही पाठवले असून त्यामध्ये एका डॉक्टरसह १२-१४ स्वयंसेवकांचा समावेश असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाºयांनी दिली. एसपीसीए या संस्थेचे ठाण्यातील ब्रह्मांड येथे रुग्णालय असून तेथे पशुपक्ष्यांवर उपचार केले जात आहेत. केरळ येथील अतिवृष्टीने तेथे पूरस्थिती निर्माण झाली आहे.त्या पूरग्रस्तांना मदतकार्य सुरू असताना, आपणही त्यामध्ये खारीचा वाटा उचलावा, म्हणून या संस्थेने केरळवासीयांबरोबरच तेथील कुत्री-मांजरं यांच्यासह अन्य जनावरांना मदतीची गरज असल्याची ही बाब लक्षात घेत, या संस्थेने तेथील श्वानांसाठी एक हजार किलो, मांजरांसाठी 50 किलो खाद्यपदार्थांची पाकिटे तसेच इतर जनावरांसाठी एक लाखाची विविध औषधे, तर पूरग्रस्तांसाठी तांदूळ, तूरडाळ, बिस्किटांचे १०० बॉक्स, दुधाची पावडर, पाण्याच्या बाटल्या याच्यासह १०० पीस ताडपत्री अशा जीवनावश्यक वस्तू ट्रक भरून बुधवारी पाठवल्या आहेत.तसेच आवाज आणि रॉ या दोन सामाजिक संस्थांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांसह १२-१५ स्वयंसेवक केरळमधील कोचीन येथे रवाना झाले आहेत. रवाना झालेला एक ट्रक आणि हे पथक शुक्रवारी पोहोचले. तसेच हे पथक १० दिवस तेथील पशुपक्ष्यांवर उपचार करणार असल्याची माहिती एसपीसीए संस्थेचे पदाधिकारी तथा डॉ. सुहास राणे यांनी बोलताना दिली.
ठाणे सेना जिल्हा शाखेकडून केरळ पूरग्रस्तांना मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 12:38 AM