मीरारोड - राज्यात झिका विषाणूचा प्रसार वाढत आहे. सुदैवाने मीरा भाईंदर शहरात झिका रुग्ण आढळून आलेले नाहीत. तथापी झिका व्हायरस बाबत माहीती देणे व विशेषतः गर्भवती महिलांनी घ्यावयाची दक्षता याबाबात शहरांतील नागरीकांना जागरूक करण्यासाठी महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी आरोग्य विभागाला जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत.
झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. झिका विषाणू रोग हा मुख्यतः एडीस डासांव्दारे प्रसारित होणाऱ्या विषाणूमुळे होतो. हा डास दिवसा चावतो, याच डासामुळे डेंग्यू पसरतो. या डासाची उत्पती ही स्वच्छ पाण्यात होते. ताप येणे, अंगावर चट्टे उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायु दुखी, थकवा आणि डोकेदुखी ही झिका डासाची लक्षणे आहेत. ही लक्षणे सौम्य स्वरुपाची असतात आणि ती २ ते ७ दिवसांपर्यंत राहतात. झिका आजारावर घरात उपचार होवू शकतात. परंतु गरोदर महिलांच्या बाबत चिंतेची बाब निदर्शनास आली आहे. गर्भधारणे दरम्यान झिका विषाणूच्या संसर्ग झाल्यास शिशु मायक्रोसेफली आणि इतर जन्मजात विकृतीसह जन्माला येऊ शकते. झिका विषाणूचा संसर्ग गर्भावस्थाचा मुदतीपुर्वी जन्म आणि गर्भपात यासह इतर गुंतागुंतीशी संबंधित आहे. प्रौढ आणि मुलांमध्ये झिका विषाणूच्या संसर्गाशी संबंधित न्यूरोलॉजिकल गुंतागुंत होण्याची जोखीम आहे.
गरोदरपणामध्ये झिका विषाणूची बाधा झाल्यास होणाऱ्या अर्भकाच्या डोक्याचा घेर कमी होतो असे दिसून आले आहे. या आजारावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस अद्याप उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरिकांनी स्वतः ची काळजी आपण घेणे अनिवार्य आहे. डासोत्पत्ती स्वानांचा प्रतिबंध करणे , घरातील झाडांना घातलेले पाणी साचू देवू नये, वैयक्तीक स्वरक्षणासाठी मच्छरदाणी, डास प्रतिबंधात्मक मलम यांचा वापर करावा, फुल बाहयाचे व पूर्ण शरीर झाकणारे कपडे घालावेत. विना कारण इतरत्र प्रवास करु नये. ताप येत असेल तर घरातच उपचार न करता आपल्या आशा वर्कर यांना अवगत करावे.
शहरात पाणी साचणाऱ्या ठिकाणी महापालिका डास नाशक औषध फवारणी करत आहेच. आपले बाळ सशक्त व सुदृढ जन्माला येईल यासाठी या सुचनांचे पालन करून काळजी घेणे आवश्यक आहे. आयुक्त संजय काटकर यांच्या आदेशानुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ . बिरू दुधभाते यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका अंतर्गत सर्व वैद्यकीय अधिकारी, प्रसविका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आणि आशा वर्कर यांना जनजागृती पत्रकाचे वाटप कार्य क्षेत्रातील हॉस्पिटल, क्लिनिक, लॅब, सोसायटी अशा सर्व ठिकाणी करण्यात येत आहे. तसेच पत्रकामध्ये दिल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात जनजागृती करून ,सर्वेक्षण दरम्यान आढळून आलेल्या संशयित गरोदर महिलांच्या तपासणी साठी आरोग्य केंद्रात आणले जाते. व योग्य ते उपचार आणि मार्गदर्शन वैद्यकीय अधिकाऱ्याकडून केले जात असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे