ठाणे : दिव्यात गुरुवारी झालेल्या आंदोलनानंतर ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेने ठाणे-सीएसएमटी आणि ठाणे-बदलापूर या मार्गांवर गर्दीच्या वेळेस दोन विशेष महिला लोकल सुरू करण्याची मागणी मध्य रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली.
दररोज लोकलमधून ७० लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामध्ये एकट्या ठाणे शहरातून सात लाख प्रवासी प्रवास करत असून त्यामध्ये महिलांची संख्या अडीच लाख आहे. मध्यंतरी, कल्याणच्या धर्तीवर ठाणे शहरातून एक खास विशेष लोकल सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी सोडण्यात यावी, अशी मागणी जोर धरत असताना, ठाणे ते सीएसएमटी आणि ठाणे ते बदलापूर या मार्गांवर दोन विशेष महिला लोकल सुरू कराव्यात, अशी मागणी केल्याचे प्रवासी संघटना अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.