- बदलापूरबदलापूर - कोळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या दुबे रुग्णालयात डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत या ठिकाणी डॉक्टरांना अभावे केवळ ओपीडी सुरू ठेवण्यात आली आहे मात्र मूळ डॉक्टर सुट्टीवर गेल्यावर ओपीडी चालवणे देखील शक्य होत नाही.
राज्यातील आरोग्य व्यवस्था ढासळली असल्याचे आरोप विरोधकांकडून होत असतानाच बदलापूर नगरपालिकेचे दुबे रुग्णालय बंद असल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात आल्यानंतर त्यांना रुग्णालय बंद असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून माहिती घेतली असता रुग्णालयातील रिक्त पदे भरली नसल्याने सर्व भार एकाच डॉक्टरवर आहे आणि ते देखील आजारी असल्याने हे रुग्णालय बंद ठेवण्यात आल्याच सांगण्यात आले. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचा सर्व भार एकाच डॉक्टरवर असल्याने ते रजेवर आहेत. त्यामुळे सध्या बदलापुरातील रुग्णांचे मोठ्याप्रमाणात हाल होत असून या रुग्णांना इतर रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे.
याबाबत रुग्णालयाचे डॉक्टर राजेश अंकुश यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे बदलापूर नगरपालिकेचे रुग्णालयच बंद असल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य रामभरोसे असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. बदलापूर पालिकेच्या कार्यालयाला लागूनच हे दुबे रुग्णालय असून या रुग्णालयात डॉक्टरांअभावे केवळ ओपीडी चालवली जाते. या ठिकाणी एकाही रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करता येत नाही. त्यामुळे नावापुरते सुरू असलेले हे रुग्णालय नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी अपुरे पडत आहे. शहरात मोठी विकास कामे सुरू असताना आरोग्य व्यवस्था मात्र कोमात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.