ठाणेः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य ईडीच्या चौकशीमुळे मुंबई आणि ठाण्यातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. 22 ऑगस्टला राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलवल्यास ठाणे बंद करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. विशेष म्हणजे या मुद्द्यावरून ठाण्यातील मनसैनिक कमालीचे संतप्त झाले असून, 22 ऑगस्ट रोजी कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास सरकार जबाबदार असेल, असा इशाराच जाधव यांनी दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएम मशिनच्या विरोधात संपूर्ण देशभर वातावरण तापवण्याचे काम करत आहेत. यासंदर्भात त्यांनी ममता बॅनर्जी यांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर आता कोहिनूर मिलच्या संदर्भात ईडीची चौकशी लावण्याचे संकेत भाजप सरकारने दिले आहेत. याचे पडसाद मुंबई, ठाण्यात उमटायला सुरुवात झाले असून, ठाण्यात या विरोधात आतापासून वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.22 ऑगस्टला जर राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलावले तर ठाणे बंद करण्याचा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. यासंदर्भात कार्यकर्त्यांची बैठक देखील घेण्यात येणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. ईव्हीएमच्या विरोधात राज ठाकरे यांनी देशभर आंदोलन केल्यामुळेच सरकार कडून हा राजकीय सूड उगवला जात असून संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेष करून ठाण्यात यामुळे तीव्र आंदोलन छेडले जाईल असे जाधव यांनी सांगितले