Thane Crime : पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच ठाण्यातही महिला अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेशी आक्षेपार्ह वर्तन करणे पुरुषाला चांगलेच महागात पडले आहे. महिलेने आरोपीच्या गुप्तांगावर किचनमधील धारदार वस्तूने वार केला. त्यामुळे आरोपी जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे एका पुरुषाने अत्याचार केल्याचा प्रयत्न केल्यानंतर महिलेने स्वत:चे संरक्षण करण्यासाठी त्याच्या प्रायव्हेट पार्टवर धारदार लोखंडी वस्तू मारून त्याला जखमी केले. शनिवारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. आरोपी अनिल सत्यनारायण राचा याने दारूच्या नशेत भिवंडी भागातील एका २६ वर्षीय महिलेसोबत तिच्या घरी आक्षेपार्ह वर्तन केले. आरोपी आणि महिला एकमेकांना ओळखत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शुक्रवारी दुपारी ४.३० च्या सुमारास आरोपी अनिला हा महिलेच्या घरी गेला होता. त्यावेळी तो दारुच्या नशेत होता. अनिलने महिलेसोबत आक्षेपार्ह वर्तन करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. स्वत:ला वाचवण्यासाठी महिलेने आरडाओरड सुरु केली आणि किचनकडे धाव घेतली आणि हातात धारदार वस्तू उचलली. महिलेने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर धारदार वस्तू मारून त्याला जखमी केले. यानंतर जखमी अनिल महिलेच्या घरातून पळून गेला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेच्या तक्रारीच्या आधारे, भिवंडी शहर पोलिसांनी अनिलविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत लैंगिक छळासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी अद्याप रुग्णालयात असल्याने त्याला अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती भिवंडी पोलिसांनी दिली आहे. महिलांसोबत गैरवर्तनाची ही पहिली घटना नाही. नुकतीच कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याने सध्या देशभरातील डॉक्टरांकडून निषेध करण्यात येत आहे. एकीकडे डॉक्टरांसोबतच सर्वसामान्य नागरिकही आंदोलनात सहभागी होत आहेत. दुसरीकडे अशा घटना थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.