ठाणे : ऐन लॉकडाऊनमध्ये लादलेल्या वीजदरवाढीविरोधात सवलतीला नकार देणा-या महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपने ठाण्यात सोमवारी वीजबिलांची होळी करून आंदोलन केले. या जोरदार आंदोलनानंतर पोलिसांनी भाजपच्या तीन आमदारांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन काही वेळानंतर त्यांची सुटका केली. ठाण्यातील १२ ठिकाणी हे आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंगला पुरता हरताळ फासल्याचे दिसून आले.
महाविकास आघाडी सरकारने लादलेली अवास्तव वीजबिले वसूल करण्याचे जाहीर करून जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप करून सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करून जनतेला सवलत देण्यासाठी भाजपतर्फे सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. त्यानुसार, ठाण्यातील महावितरणच्या वागळे इस्टेट येथील मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन झाले. या आंदोलनात भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार व प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण, संजय केळकर, निरंजन डावखरे, माजी खासदार किरीट सोमय्या, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, प्रदेश सचिव संदीप लेले, महिला आघाडीच्या अध्यक्षा मृणाल पेंडसे, मंडल अध्यक्ष सुनील कोळपकर यांच्यासह भाजपचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच वीजबिलांची होळी करण्यात आली. मात्र, आंदोलन संपल्यानंतर पोलिसांनी आमदारांसह विनय सहस्रबुद्धेंना सोडून इतर सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसांच्या वाहनांमधून श्रीनगर पोलीस ठाण्यात नेऊन नंतर त्यांची काही वेळानंतर सुटका केली.