संदीप प्रधान / अजित मांडकेठाणे : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याने ठाणे जिल्ह्याला किती मंत्रिपदे मिळणार व जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार, याची चर्चा सुरू झाली आहे. गणेश नाईक, रवींद्र चव्हाण व बालाजी किणीकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पालकमंत्रिपद भाजप आपल्याकडे राखण्याचा आग्रह धरील, अशी चर्चा आहे. तसे झाल्यास रवींद्र चव्हाण हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होऊ शकतात, असे बोलले जाते.
ठाणे जिल्ह्याकडे मुख्यमंत्रिपद असल्याने मंत्रिमंडळ तयार करताना प्रादेशिक समतोल साधताना ठाण्याला दोन कॅबिनेट व दोन राज्यमंत्रिपदे मिळतील, अशी चर्चा आहे. गणेश नाईक यांना ज्येष्ठ नेते म्हणून मंत्रिमंडळात भाजपला संधी द्यावी लागेल. याखेरीज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय रवींद्र चव्हाण यांचाही मंत्रिमंडळात समावेश होईल, असे समजते. शिंदे हे बालाजी किणीकर या आपल्या समर्थकाला राज्यमंत्रिपद मिळावे याकरिता प्रयत्न करतील. किणीकर हे वैद्यकीय पेशातील असल्याने आरोग्य राज्यमंत्री म्हणून त्यांचा समावेश केला जाऊ शकतो.
भाजपमधील ज्येष्ठ आमदार किसन कथोरे यांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. परंतु त्यांचा समावेश होईल किंवा कसे याबाबत मतमतांतरे आहेत. भाजपमधील केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासोबत त्यांचा संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे. संजय केळकर (भाजप) व प्रताप सरनाईक (शिवसेना) हेही मंत्रिमंडळ समावेशाकरिता प्रयत्नशील आहेत. केळकर हे ठाण्यातील भाजपचा चेहरा आहेत. निष्ठावंत आहेत. भाजपमध्ये आयारामांची चलती असल्याचा आरोप खोडून काढायचा असेल तर केळकर यांचा समावेश केला जाईल, असे पक्षात बोलले जाते. सरनाईक यांना लागलीच राज्यमंत्रिपद दिले जाते की, कालांतराने महामंडळ दिले जाते याचे कुतूहल आहे.
काँग्रेसच्या काळात नाईकांनी भूषवले पदठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार याचे कुतूहल आहे. मुख्यमंत्रीपद शिंदे यांच्याकडे असल्याने ते आपल्या एखाद्या खास मंत्र्याला ठाण्याचे पालकमंत्री करून जिल्ह्यावरील पकड घट्ट ठेवतील. मात्र दिल्लीतील भाजपचे चाणाक्य ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भाजपकडे सोपवण्याची अट शिंदे यांच्यापुढे ठेवू शकतात. तसे झाल्यास शिंदे व फडणवीस या दोघांनाही जवळ असलेले रवींद्र चव्हाण यांच्याकडे पालकमंत्रिपद येऊ शकते. मात्र दिल्लीला भाजपमधील अधिक वजनदार नेता पालकमंत्री हवा असल्यास गणेश नाईक यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाऊ शकते. यापूर्वी दोन्ही काँग्रेसचे सरकार सत्तेत असताना नाईक हे पालकमंत्री होते.