ठाणे : पुण्यात घडलेल्या होर्डिंग्जच्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेला जाग आली आणि शहरातील सर्व होर्डिंग्जचा प्रत्येक वर्षी आढावा घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यासाठी प्रत्येक होर्डिंग्जच्या ठेकेदाराला नोटीस बजावून त्यांच्याकडून स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, २१८ होर्डिंग्जधारकांनी हा अहवाल सादर केला असून तो समाधानकारक असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु, दर सहा महिन्यांनी असा अहवाल मागवला जाईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.पुण्यात घडलेल्या होर्डिंग्जच्या दुर्घटनेमुळे ठाण्यातील होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहरातील अधिकृत होर्डिंग्जची संख्या पालिकेच्या रेकॉर्डवर असली, तरी अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या होर्डिंग्जकडे मात्र अजूनही पालिका प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही. बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे ठाणे शहर हे संपूर्णपणे होर्डिंग्जच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे. ठाणे महापालिकेने ज्यांना होर्डिंग्ज उभारण्यासाठी परवानगी दिली आहे, अशा सर्वांना नोटिसा पाठवल्या होत्या. यामध्ये त्यांनी उभारलेले होर्डिंग्ज स्थिर आणि सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार होते. यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती.पालिकेने ४५० होर्डिंग्ज उभारणीसाठी परवानगी दिली असून त्यापैकी अनेकांनी एकाच बांधकामावर दोन होर्डिंग्ज उभारले आहेत. त्यामुळे शहरात त्यांचा आकडा २१८ इतका आहे. लोखंडी खांबांची उभारणी करून त्यावर ती उभारली आहेत. या लोखंडी खांबांच्या सांगाड्याचे आणि पिलरच्या बांधकामाचे संरचनात्मक परीक्षण ठेकेदारांनी केले असून त्यासंबंधीचा अहवाल महापालिकेच्या जाहिरात विभागाकडे दिला आहे.दर सहा महिन्यांनी पाहणीमहापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी या वृत्तास दुजोरा दिला. ठेकेदारांनी दिलेल्या अहवालात होर्डिंग्जचे बांधकाम धोकादायक नसल्याचे म्हटले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दर सहा महिन्यांनी पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाण्यातील होर्डिंग्ज सुस्थितीत! पालिका म्हणते, अहवाल समाधानकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:49 AM