- प्रशांत मानेडोंबिवली - येथील मोबाईल शॉपच्या छताचा पत्रा उचकटून चोरी केलेले मोबाईल विक्रीसाठी आलेल्या दोघा चोरटयांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सापळा लावून मंगळवारी अटक केली. विरेंद्र नाटेकर ( वय ३९ ) आणि प्रेम दुवा (वय २९ ) अशी दोघा अटक आरोपींची नावे आहेत. त्यांचा आणखीन एक साथीदार फिरोज खान उर्फ मोनु हा अदयाप फरार आहे. हे सर्व उल्हासनगर आणि अंबरनाथचे रहिवासी आहेत.
येथील पुर्वेकडील रेल्वे स्थानकाजवळील केळकर रोड येथील गणेश इलेक्ट्रॉनिक्स या मोबाईल दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून आतील पीओपी फोडून त्यावाटे आत प्रवेश करून चोरटयांनी इथले ७० हजार रूपयांचे मोबाईल आणि ६० हजार रूपयांची रोकड असा १ लाख ३० हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २५ जानेवारीला रात्री घडली होती. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान या गुन्हयाचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने सुरू होता. या विभागाचे पोलिस हवालदार दत्ताराम भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, दोन व्यक्ती विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या बाहेरील परिसरात चोरीचे मोबाईल विक्रीसाठी घेऊन येणार आहेत. ही माहीती मिळताच वरीष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार, पोलिस निरीक्षक राहुल मस्के, सहाय्यक पोलिस निरिक्षक संदीप चव्हाण, संतोष उगलमुगले, पोलिस उपनिरिक्षक संजय माळी, पोलिस हवालदार दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, विलास कडु, पोलिस नाईक दिपक महाजन, पोलिस कॉन्स्टेबल गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, गोरक्ष शेकडे आदिंनी संबंधित ठिकाणी सापळा लावला. गुप्त बातमीदाराने केलेल्या वर्णनावरून दोन व्यक्ती विठ्ठलवाडी बस डेपोसमोर येताच त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.
दोघांची चौकशी केली असता त्यांनी डोंबिवलीतील मोबाईल शॉप फोडून मोबाईल चोरल्याची आणि ते विक्री करण्यासाठी विठ्ठलवाडी तसेच कल्याण कोळसेवाडी परिसरात आल्याची कबुली पोलिसांकडे दिली. विरेंद्र नाटेकर आणि प्रेम दुवा अशी अटक आरोपींची नावे असून त्यांच्याकडून सहा स्मार्ट मोबाईल फोन आणि १ टॅब असा ६२ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघांचा ताबा रामनगर पोलिसांना दिला आहे अशी माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक पवार यांनी दिली.