ठाणे/उल्हासनगर/अंबरनाथ/मीरा रोड : नववर्ष स्वागतानिमित्ताने मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्या ५९७ तळीरामांची नशा ठाणे शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दंड ठोठावून उतरवली. ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरमधील १८ युनिटच्या ५५० पोलिसांनी या कारवाईतून चार लाख ५१ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला. गेल्या वर्षी मात्र, ७७५ तळीरामांकडून १४ लाख १६ हजारांचा दंड वसूल केला होता. गाडीचा परवाना नसणे, नो पार्किंगच्या जागी गाडी लावणे, गाडीवर दोनपेक्षा जास्त जण बसणे यासाठीही पोलिसांनी कारवाई केली. ठाण्यात नौपाडा, ठाणेनगर, कळवा, मुंब्रा, कासारवडवली, कापूरबावडी, राबोडी आणि वागळे इस्टेट या युनिटच्या तीन हात नाका, कॅडबरी जंक्शन, नितिन कंपनी, आनंद नगर नाका, कोपरी, माजीवडा जंक्शन, गोल्डन डाईज नाका आदी ठिकाणच्या तपासणीत २९२ जणांवर कारवाई करण्यात आली. कल्याण उपविभागातील कल्याण, डोंबिवली आणि कोळसेवाडी या युनिटमधील महामार्ग, एसटी स्टॅन्ड, शिवाजी चौक, लाल चौकी, दुध नाका, दुर्गाडी चौक, पारनाका आदी भागातील कारवाईत १११ वाहनचालकांना पकडण्यात आले. भिवंडीतील वंजारपट्टी नाका, कल्याण नाका, जकात नाका, धामणकर नाका आणि शिवाजी चौक या भिवंडी, नारपोली आणि कोन गाव युनिटच्या कारवाईत ११४ जणांची झिंग उतरविण्यात आली. उल्हासनगर, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, बदलापूरच्या नाकाबंदीत ८० मद्यपी चालकांना पकडण्यात आले. चारही विभागातील ९० मुख्य नाक्यांवर ३१ डिसेंबरच्या सायंकाळी ४ ते १ जानेवारीच्या पहाटेपर्यन्त ही तपासणी झाली. मद्यपी वाहन चालकांनी किती प्रमाणात अल्कोहोल घेतले, याची चाचपणी श्वासविश्लेषक यंत्राद्वारे करण्यात आली. मीरा रोडला ४७ जणांवर कारवाई करण्यात आली.उल्हासनगरला १७ सेक्शन परिसरात बारसमोर पार्किंग आणि जुन्या वादातून विक्की वानखडे यांला काही जणांनी मारहाण करून पोटात चाकूने वार केल्याची घटना घडली. कॅम्प नं-३ जसलोक हॉस्पिटलसमोर रस्त्यातून जाणाऱ्या सागर रोहिडा यांना अफजल, गोपाल, विकी, राजू यांनी मारहाण केली आणि भोसकले. (प्रतिनिधी)
ठाण्यात उतरवली ५९७ तळीरामांची नशा
By admin | Published: January 02, 2017 3:51 AM