भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येबरोबर त्यांचा उपद्रवही वाढतो. त्यांची संख्या नियंत्रणात राहण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून श्वानांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यात येते. महापालिका खासगी संस्थेच्या माध्यमातून शहरातील भटक्या श्वानांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करते. संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये २००४ ते २०१९ पर्यंत ५८ हजार ५३७ भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण केले. त्यासाठी पालिकेने ८ कोटी रुपये खर्च केले आहेत. या कामासाठी पुन्हा नव्याने दीड कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ऑगस्ट २०१९ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला होता परंतु निर्बिजीकरण शस्त्रक्रियेवर आक्षेप घेत नगरसेवकांनी हा प्रस्ताव मंजूर केला नव्हता. दोन महिन्यांनंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत हाच मुद्दा उपस्थित झाला होता. संबंधित संस्थेचा ठेका संपल्यामुळे गेल्या वर्षभरापासून ही शस्त्रक्रिया बंद असल्याची माहिती प्रशासनाने त्यावेळेस दिली होती. त्यानंतर या कामाचा नवीन ठेका काढण्यासाठी सर्वसाधारण सभेने तीन वर्षांपूर्वी मंजुरी दिली तरीही हे काम अद्याप सुरू झाले नसल्याचे सभेत उघडकीस आली. कामाला मंजुरी देऊनही ते का सुरू होऊ शकलेले नाही, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी उपस्थित केला. कामाच्या मंजुरीचा ठराव उशिरा प्राप्त झाला असून जून महिन्यात कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच हे काम सुरू होईल, असे पालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी क्षमा शिरोडकर यांनी सांगितले. भटक्या श्वानांबरोबरच मांजरांची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्याचाही निर्णय यापूर्वीच घेतला असून त्याचीही अंमलबजावणी करण्याची सूचना मुल्ला यांनी केली.
ठाण्यात श्वानाबरोबर मांजरांचीही होणार निर्बिजीकरण शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 4:44 AM