- जितेंद्र कालेकर ठाणे - मुंब्य्रतील वादग्रस्त शाखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास भेट दिली. यावेळी त्यांनी शहर प्रमुख मोबीन सुर्वे यांच्यासह शिवसैनिकांशी संवाद साधला. मतदार सूज्ञ असून ते विकासाला मतदान करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. कळवा मुंब्रा मतदारसंघातून मतदारांनी जास्तीत जास्त मतदान केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर मुंब्रा येथील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने शाखेवर ताबा घेण्यात आला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणात मुंब्य्रातील या शंकर मंदिर परिसरातील शाखेवर राडा झाल्याचे पहायला मिळाले. विशेष म्हणजे या शाखेला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याचबरोबर विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनीही भेट दिली हाेती. परंतू रविवारी (१९ मे रोजी) पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वादग्रस्त शाखेला भेट दिली. समाजातील प्रत्येक घटकासाठी आम्ही काम केलं आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटक आपल्या सोबत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
या दरम्यान त्यांनी शिवसेना कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख विजय गोरे, शहर प्रमुख मोबीन सुर्मे, माजी नगरसेवक राजन किणे आणि शिवसैनिकांची भेट घेत चर्चा केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव तसेच कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार, महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातच कळवा मुंब्रा हा विधानसभा मतदारसंघ येताे. अवघ्या काही तासांवर मतदानाच्या प्रक्रीया आली आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी गाफील राहता कामा नये, असा कानमंत्र त्यांनी यावेळी दिला. मतदान लोकशाहीचा पवित्र अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मतदान लोकशाहीचा हा पवित्र अधिकार आहे. त्यामुळे सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. सर्वांना विकास हवा आहे आणि विकास करणारे आमचे सरकार आहे. आमचा अजेंडा हा विकासाचा आहे. टोरेंट विद्युत कंपनी बाबत अनेक तक्रारी कळाल्या आहेत. आमचे सरकार सामान्य नागरिकांसोबत आहे. निवडणुका होताच टोरंट बाबत बैठक घेऊन लोकांच्या हिताचा निर्णय घेऊ, असंही शिंदे यांनी सांगितले. कल्याण लोकसभेत समावेश असलेला मुंब्रा एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड या मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिदेंसाठीही हा मतदारसंघ तितकाच महत्वाचा आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सोमवारी पार पडणार आहे. कल्याण आणि ठाणे एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेले मतदारसंघ मानले जातात. या सर्व पार्श्वभूमीवर या भागातील शिंदे यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे.