लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शहरात नालेसफाईसाठी कंत्राटदाराने बालमजुरांना जुंपल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यामुळे त्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
ठाण्यातील सतीश प्रधान महाविद्यालयामागील नाल्याची सफाई करण्यासाठी कंत्राटदाराने चक्क मुलांना जुंपले. लहान मुलांचे खेळण्या-बागडण्याचे वय असताना कंत्राटदाराने त्यांना सुरक्षेची साधने न पुरवता नाल्यातील गाळ उपसण्यास भाग पाडले. या प्रकरणी संबंधित कंत्राटदारावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केली आहे. याबाबत ठाणे महापालिका आणि पोलिसांना पाचंगे यांनी पत्र दिले आहे. त्यात संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, असेही पाचंगे यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, मीरा-भाईंदरमध्ये नालेसफाईसाठी बालमजुरांना जुंपणाऱ्या कंत्राटदाराला १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच धर्तीवर ठाण्यात कारवाई झाल्यास इतर कंत्राटदारांना जरब बसेल, असे पाचंगे म्हणाले.
स्वच्छता निरीक्षक, साहायक आयुक्तांवरही कारवाई व्हावी
नालेसफाईच्या कामादरम्यान कंत्राटदारांनी करारनाम्यातील अटी, शर्तींचा भंग करून बालमजूर कामाला जुंपल्याने आता संबंधित स्वच्छता निरीक्षक, साहायक आयुक्तांवरही कारवाई व्हावी, असे पाचंगे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
------------------