लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मोरोक्को या देशाची जगातील आकाराने सर्वात लहान नोट, फिजी आईसलँडची सात डॉलर्सची उभी नोट, आपल्या देशातील १९५० ते १९७८ पर्यंत चलनात असलेली दहा हजारांची जुनी व सर्वांत मोठी तसेच, महागडी नोट, आपल्या देशांतील १९१७ पासून ते आतापर्यंतच्या एक रुपयांच्या २२ प्रकारांच्या नोटा, जे देश ज्ञातच नाही अशा लहान लहान देशांतील नोटा अशा २०० देशांतील चलनी नोटांचे अनोखे प्रदर्शन शनिवारी ठाणेकरांना अनुभवता आले. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला-पुरूष वर्ग हे प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते.
‘टीजेएसबी’ने हे प्रदर्शन आयोजित केले होते. त्यात इंडोनेशियातील एका नोटेवर श्री गणेशाचे चित्र, मॉण्टेसरी कोर्स ज्यांच्यामुळे प्रसिद्ध झाला त्या मारिया मॉण्टेसरी यांचे छायाचित्र असलेली इटलीची नोट, एव्हरेस्ट शिखर काबीज केलेल्या सर एडमंड हिलरी यांचे छायाचित्र असलेली न्युझीलंड देशाची नोट, भारतातील पोर्तुगीज, फ्रेंच व ब्रिटिश राजवटीतील दुर्मिळ नोट, झिंबाब्बे देशाने प्रस्तुत केलेली तसेच गिनीज बुक्स आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्थान मिळवणारी शंभर ट्रिलियन डॉलर चलनी नोट, अमिताभ घोष केवळ १४ दिवस रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते त्यांच्या सहीची एक दुर्मिळ नोट, गियाना देशातील पोस्टल स्टँम्पवर श्रीकृष्ण रंगपंचमी खेळत असल्याचे चित्र अशा अनेक प्रकारच्या वैविध्यपूर्ण नोटा यात होत्या.
या प्रदर्शनात ऐतिहासिक नोटांचा समावेश असून विविध देशातील विविधरंगी व आकारांच्या, विविध मुल्यांच्या, विविध आंतरराष्ट्रीय नेत्यांची छायचित्रे असलेल्या दुर्मिळ नोटा व नाणी ठाणेकरांना पाहता आली. बँक आॅफ महाराष्ट्रचे निवृत्त उपव्यवस्थापक संजय जोशी यांनी हे संकलन केले आहे. यावेळी बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक अजित रानडे व विनायक नवरे, शाखा व्यवस्थापक अरुण देसाई उपस्थित होते.ज्या देशांची नावेही कधी ऐकली नाहीत त्या देशांतील नोटा पाहता आल्या. एक वेगळे प्रदर्शन अनुभवायला मिळाले.- संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा
पहिल्यांदा अशा प्रकारचे प्रदर्शन आम्ही पाहिले.- विजया वाकचौरे, ज्येष्ठ नागरिक
हे प्रदर्शन मला आवडले असून मी ही नोटा संग्रहीत करण्यास सुरुवात केली आहे. सध्या माझ्याकडे १५ ते १६ देशांच्या नोटा आहेत.- निलब शेजवलकर, विद्यार्थी, ए.के.जोशी विद्यालय