लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनामुळे थंडावलेल्या गृहखरेदीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कामध्ये दोन टक्के सवलत जाहीर केली होती. सहाऐवजी चार टक्के मुद्रांक शुल्काची मुदत ३१ मार्च २०२१ पर्यंत होती. या सवलतीचा ठाण्यातील ४५ ग्राहकांनी अखेरच्या दिवशी फायदा घेत ५८ लाख ३८ हजार ४९० रुपये मुद्रांक शुल्कापोटी भरल्याची माहिती निबंधक कार्यालयाच्या सुत्रांनी ‘लोकमत’ला दिली.
कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्यानंतर अनेक गृहप्रकल्प उभे राहूनही बहुतांश ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरविली होती. या व्यवसायाला उभारी देण्यासाठी राज्य सरकारने घर तसेच जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारांवरील मुद्रांक शुल्कामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सवलत जाहीर केली होती. पूर्वी प्रत्येक व्यवहारामागे सहा टक्के इतके मुद्रांक शुल्क आकारले जात होते. ते सहावरुन चार टक्के करण्यात आले होते. त्याची मुदत ३१ मार्च २०२१ पर्यंत होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये घर आणि जमीन खरेदी विक्रीसाठी ग्राहकांनी धावपळ केल्याचे पाहायला मिळाले. ३० मार्च रोजी ४८ ठाणेकरांनी हे व्यवहार केले. त्यासाठी एक लाख २६ हजार ६४५ रुपये इतके मुद्रांक शुल्क भरण्यात आले. तर ११ लाख ८७ हजार ८०० रुपये इतके नोंदणी शुल्क जमा झाले. त्यापाठोपाठ ३१ मार्च २०२१ या अखेरच्या दिवशी ४५ ग्राहकांनी घर खरेदी विक्रीचे व्यवहार केले. त्यापोटी ५८ लाख ३८ हजार ४९० इतके मुद्रांक शुल्क भरण्यात आले, तर नऊ लाख ८९ हजार ४०० रुपये इतके नोंदणी शुल्क भरण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
........
कोरोनामुळे जमीन आणि गृह खरेदी विक्रीचे व्यवहार थंडावले होते. शासनाने मुद्रांक शुल्कात दोन टक्के सवलत दिल्यामुळे या व्यवहारांमध्ये चांगली वाढ झाली. ठाण्यातही ३१ मार्च रोजी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत ग्राहकांनी गृह खरेदीच्या व्यवहारांना प्रतिसाद दिला.
गणपत पवार, प्रभारी सहदुय्यम निबंधक, ठाणे शहर