ठाणे : शहर विद्रुपीकरणात भर घालणारे राजकीय शुभेच्छांचे, कार्यक्रमांचे नेत्यांच्या वाढदिवसाचे बॅनर लोकसभेची आचारसंहिता लागताच निघाले आहेत. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नऊ प्रभाग समिती अंतर्गत सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरु करण्यात आली असून एका दिवसात ३५०० बॅनर, पोस्टर उतरविण्यात आले आहेत. त्यामुळे ठाण्याने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने का होईना मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ठाण्याच्या विविध भागात राजकीय बॅनर मोठ्या प्रमाणात झळकले होते. यात शासन आपल्या दारी, नमो महारोजगार मेळावा, विविध स्वरुपाची भुमीपुजने, लोकार्पणे, आपल्या आवडता नेता ठाण्यात येणार म्हणून लावण्यात आलेले स्वागताचे बॅनर यामुळे ठाणे शहर हे विद्रुपी झाले होते. किंबहुना ठाणे शहर हे या बॅनरबाजीमुळे गुदमरुन गेले होते. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून देखील या अनाधिकृत बॅनर पोस्टरवर कोणत्याही स्वरुपाची कारवाई केली जात नव्हती. मुख्य रस्त्यांवरील विद्युत खांबांवरही फलक लावले जातात. अशा प्रकारचे बॅनर लावण्यामध्ये राजकीय पक्षांचे नेते आघाडीवर असल्याचे दिसून येते. अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी पालिकेने शहरातील काही ठिकाणे निश्चित करून त्याठिकाणी बॅनर लावण्यासाठी परवानगी घेण्याची योजना सुरू केली होती. यानंतरही शहरात बेकायदा बॅनर लावण्याचे प्रकार सुरुच होते.दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होताच ठाणे महापालिकेने प्रभाग समितीनिहाय पथके नेमून बेकायदा बॅनर काढण्याची कारवाई सुरू केली आहे. सहाय्यक आयुक्त आणि त्यांच्या पथकामार्फत ही कारवाई केली जात आहे. नऊ प्रभाग समिती अंतर्गत ही कारवाई सुरु आहे. शनिवारपासून सुरू झालेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत ३ हजार ५६५ इतके राजकीय पक्षांचे बॅनर हटविण्यात आले आहेत.विधान सभा निहायओवळा-माजिवाडा -२४४ कोपरी-पाचपखाडी - ८८३, ठाणे विधानसभा - ६७४, कळवा-मुंब्रा विधानसभा- १ हजार ४०४दिवा - ३६०
पालिका मुख्यालयातील पदाधिकाºयांच्या कार्यालयांना लागले टाळे
ठाणे महापालिकेत दोन वर्षांपुर्वी प्रशासकीय राजवट लागू आहे. त्यानंतर महापौर, उपमहापौर, सभागृह नेते तसेच इतर पदाधिकाºयांची कार्यालये यापुर्वीच टाळे लावून बंद करण्यात आली आहेत. असे असले तरी राजकीय पक्षांची कार्यालये मात्र सुरू होती. लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका मुख्यालयातील राजकीय पक्षांच्या कार्यालयांना प्रशासनाने टाळे लावले आहे. आचारसंहिता संपेपर्यंत ही कार्यालये बंद राहणार असल्याचे पालिकेने कार्यालयाना लावलेल्या नोटीसवर म्हटले आहे. तसेच कार्यालयाबाहेरील राजकीय पक्षांच्या फलकांना पेपर लावून झाकण्याची कारवाई पालिकेने केली आहे. त्यामुळे राजकीय मंडळी आता पालिका अधिकाºयांच्या ताबा घेतांना दिसून आले.