ठाणे : गेल्या कित्येक वर्षांपासून कागदावर असलेला मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव ते घोडबंदरमधील गायमुख चौपाटीपर्यंतचा कोस्टल रस्ता आता खऱ्या अर्थाने मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ठाणे महापालिकेने या रस्त्याचा आराखडा तयार केला असून तो एमएमआरडीएकडे पाठविला आहे. यामध्ये सुमारे १३ किमीचा मार्ग हा काही ठिकाणी उन्नत तर काही ठिकाणी भुयारी असणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. यासाठी एक हजार २५१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
या मार्गामुळे घोडबंदरमधील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अवजड वाहनांचा भार कमी होऊन वाहतूककोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. कित्येक वर्षांपासून हा कोस्टल रोड होणार की इतिहासजमा होणार, यावरूनदेखील उलटसुलट चर्चा होती. परंतु, आता महापालिकेने आराखडा तयार करून सर्वांनाच धक्का दिला आहे. उरण येथील जेएनपीटी बंदरातून गुजरात, नाशिक आणि भिवंडीच्या दिशेने अवजड वाहतूक सुरू असते. त्याचबरोबर या शहरातून बंदराच्या दिशेनेही अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. यापैकी जेएनपीटी बंदर ते गुजरात या मार्गावरील वाहने घोडबंदरमधील मुंबई-अहमदाबाद महामार्गाचा वापर करतात. या वाहनांची संख्याही मोठी आहे. यामुळे ठाण्यातील माजिवाडानाक्यापासून ते घोडबंदर टोलनाक्यापर्यंत वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. या भागातील नागरिकांना वाहतुकीसाठी मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे त्यांना कोंडीचा फटका बसत असून याबाबत त्यांच्याकडून संतापही व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अवजड वाहतुकीचा भार कमी करून वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी कोस्टल मार्गाची घोषणा काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती.
.........
जोड- घोडबंदरच्या वाहतूककोंडीतून होणार सुटका