ठाणे : शिवसेनेचे खासदार व आमदार ठाण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना किमान वर्षाची मुदतवाढ देण्याची मागणी करत असतानाच खुद्द जयस्वाल यांनी मी राज्य शासनाला बदलीची विनंती केल्याचे शुक्रवारी महासभेत जाहीर केले. वर्षअखेरीस राज्य मंत्रिमंडळात होणारे फेरबदल व त्यापाठोपाठ नोकरशहांच्या केल्या जाणाºया बदल्या, यात जयस्वाल यांची बदली होण्याची चर्चा सुरू झाली आहे.जयस्वाल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. पालिका निवडणुकीच्या तोंडावर जयस्वाल यांना धमक्या आल्या होत्या. त्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केले, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जयस्वाल यांना धमक्या आल्या, तर त्यांनी पोलिसात तक्रार देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांना फोन का केला, असा सवाल केला होता.या पार्श्वभूमीवर सध्या जयस्वाल यांना भाजपाच्या नगरसेवकांनी न्यू वंदना सोसायटीच्या टीडीआरवरून घेरले आहे. त्यातच आयुक्तांविरोधात व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमुळे ते व्यथित आहेत. प्रशासकीय प्रमुख म्हणून मी कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतले. मात्र, काही लोकांनी वैयक्तिक टीका केल्याची खंत वाटते, असे सांगत आपल्या दीर्घ भाषणामध्ये त्यांनी लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्यातील संघर्षाच्या आठवणी उगाळून लोकप्रतिनिधींचे आभार मानले. कदाचित, ही माझी शेवटची महासभा असावी, असेही ते म्हणाले.तांत्रिक बाबींमुळे काही नगरसेवकांचे पद रद्द झाले. ती कायद्याची प्रक्रिया होती. काही लोकांनी ही कार्यवाही वैयक्तिक स्वरूपात घेतली. त्यामुळे मी गेली तीन वर्षे शहराचा विकास केला असून आता ठाणेकरांमध्ये माझे रिपोर्टकार्ड तयार आहे. ते किती सच्चे आहे, याची मी येथून गेल्यावर सर्वांना प्रचीती येईल, असे भावनिक उद्गारदेखील आयुक्तांनी काढले. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
बड्या अधिका-यांच्या बदल्या अनिवार्य-राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार व फेरबदल २६ डिसेंबरला होणार असल्याचे समजते. त्याच सुमारास विद्यमान मुख्य सचिव सुमित मलिक यांना पदावरून दूर करून त्या जागी डी.के. जैन यांची नियुक्ती होईल, अशी चर्चा आहे. मलिक यांची राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती अपेक्षित आहे. त्यानंतर, लागलीच नोकरशाहीत बडे फेरबदल अपेक्षित आहेत. त्यामध्ये जयस्वाल यांचीही बदली होईल, असे समजते. जयस्वाल हे मुख्यमंत्री कार्यालय अथवा मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास अॅथॉरिटीमध्ये नियुक्तीकरिता इच्छुक आहेत. यापैकी एका ठिकाणी त्यांची नियुक्ती होईल किंवा सिडको अथवा वित्त खात्यात जयस्वाल नियुक्त होतील, अशी मंत्रालयातील उच्चपदस्थ नोकरशहांमध्ये चर्चा आहे.