ठाणे - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली, तरी आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांना पाठिंबा देण्यावरून काँग्रेसच्या दोन गटांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.राष्ट्रवादीकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना सतत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम न करण्याची भूमिका घेतली होती. याबाबत, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनीही अहवाल सादर करणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, तो सादर करण्यापूर्वीच पूर्णेकर गटाने शहराध्यक्षांविरोधात भूमिका घेऊन आनंद परांजपे यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केल्याने पक्षामधील गटबाजी अद्याप संपली नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.संपूर्ण देशामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने जातीयवादासह देशातील भ्रष्टाचाराविरु द्ध एक मोठी आघाडी उभी केली आहे. भाजपाची राजकीय मग्रुरी आणि पंतप्रधानांची हुकूमशाही वृत्ती हे दोन्हीही या देशाच्या लोकशाहीला मारक असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. त्यासाठी सर्व समविचारी पक्षांना एकत्र करून हे सरकार उलथवून टाकण्यासाठी राहूल गांधी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत ठाण्यामध्ये शिवसेना व भाजपाला मदतच होईल, अशा पद्धतीने काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्र काढले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांना असहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. ती राहुल गांधी यांच्या विरोधातील भूमिका आहे, असे काँग्रेसच्या पूर्णेकर गटाचे म्हणणे आहे.एकीकडे राहुल गांधी धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही वाचवण्यासाठी विविध पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे व्यक्तिगत हितासाठी काँग्रेसमधील काही अंतर्गत गट शिवसेनेला मदत होईल, अशी भूमिका घेत असल्याचा आरोप पूर्णेकर गटाने केला आहे. या गटाने आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांची नुकतीच भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह ठाणे जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अॅड. झिया शेख, जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते महेश पाटील आदी उपस्थित होते.ब्लॉक अध्यक्षांच्या भूमिकेबाबत प्रदेशाध्यक्षांकडे अहवाल सादर करण्यात येणार असून त्या दृष्टीने चर्चा सुरू आहे. मात्र, काही ठरावीक लोकांना फार घाई झाली आहे. जेव्हा सर्व ब्लॉक अध्यक्ष एकमुखाने बोलतात, तेव्हा त्यांचे म्हणणे अध्यक्षांना मानावे लागते. सात ते आठ लोकांच्या पाठिंब्यावर आनंद परांजपे निवडून येत असतील, तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. राष्ट्रवादीने काँग्रेसच्या सात ते आठ लोकांना घेऊन राजकारण करू नये. चर्चेतून मार्ग काढता येईल. स्वीकृत सदस्याच्या मुद्यावर स्वत: गटनेत्यांनी माझे नाव सुचवले होते. जर राष्ट्रवादीचे मनोहर साळवी हे तांत्रिकदृष्ट्या अपात्र झाले असतील, तर दुसरे नाव माझेच येणार, यात शिवसेनेने पाठिंबा देण्याचा संबंधच नाही, हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.- मनोज शिंदे, शहराध्यक्ष, ठाणे-काँग्रेस
ठाणे काँग्रेसमधील दुफळी पुन्हा उफाळली, परांजपे यांना पाठिंबा देण्यावरून मतभेद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 4:06 AM