ठाणे : कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आणि पालिकेने सुरु केलेल्या विविध स्वरुपाच्या उपाय योजनांमुळे आणि लस कमी प्रमाणात मिळत असतांनाही लसीकरणाचा वेग वाढविल्याने ठाण्यात मेच्या संपूर्ण महिन्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांचा स्तर खाली आला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता पुन्हा ९७ टक्यांवर आले आहे. ठाणेकरांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब म्हणावी लागणार आहे.
विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात कोरोनाचे नवे तब्बल ४१ हजार २५ रुग्ण आढळले होते. तर मे महिन्यात केवळ १० हजार ७४७ नवे कोरोना रुग्ण आढळले असून याच कालावधीत तब्बल १८ हजार २८३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. तर याच कालावधीत २४१ रुग्णांचा मृत्यु झाला असून रुग्ण दुपटीचा कालावधी हा थेट ७०७ दिवसांवर गेला आहे.
ठाणे महापालिका हद्दीत आतार्पयत १ लाख २९ हजार ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील १ लाख २५ हजार ७१० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याचेही दिसून आले आहे. तर एप्रिल अखेर प्रत्यक्ष उपचार घेणा:या रुग्णांची संख्या १० हजार १३ एवढी होती. ती सद्याच्या घडीला केवळ १५३० एवढी दिसून आली आहे. फेब्रुवारी अखेर पासून ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढतांना दिसत होती. रुग्णांना बेड मिळणो देखील कठीण झाले होते. त्यातही रुग्णांचा मृत्यु देखील वाढतांना दिसत होता. त्यातही महापालिकेच्या माध्यमातून वर्षभरात १६ लाख ४३ हजार ६४४ नागरीकांची कोरोना चाचणी केली आहे. तर आजही दिवसाला ३ हजारांच्या आसपास चाचणी केल्या जात आहेत.
परंतु दुसरीकडे आता मागील महिनाभरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढतांना दिसून आले आहे. मागील एप्रिल अखेर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९० टक्के होते. तेच आता ९७ टक्यांवर आले आहे. ठाण्यासाठी निश्चितच ही चांगली गोष्ट म्हणावी लागणार आहे. ठाणो महापालिकेच्या माध्यमातून कोरोनाला अटकाव करण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. एकाला बाधा झाली तर त्याच्या संपर्कातील ३७ जणांना विलगीकरणात ठेवले जात आहे. त्यातही लॉकडाऊनमुळे देखील आता रुग्ण दरवाढीची संख्या कमी होतांना दिसत आहे.
मागील काही दिवसात रुग्ण दरवाढीचा वेग काहीसा कमी झाल्याचे दिसत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक दिसून आले आहे. एप्रिल महिन्यात शहरात ४१ हजार २५ नवे रुग्ण आढळले असून या कालावधीत १६३ रुग्णांचा मृत्यु झाला होता. याच कालावधीत तब्बल ३९ हजार ८०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. परंतु मे महिन्यात नवे रुग्ण अवघे १० हजार ७४७ एवढे आढळून आले आहेत. तर याच कालावधीत तब्बल १८ हजार २८३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे दिसून आले. परंतु रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असतांना दुसरीकडे मे महिन्यात २४१ जणांचा मृत्यु झाल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे ही थोडीशी चिंतेची बाब असली तरी देखील मृत्यु दर कमी करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत.