ठाणे - ठाणे महानगर पालिकेच्या सेवेत असणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना संरक्षक साधनांसाठी ठाणे महानगर पालिकेने दिलेले सुमारे १ कोटी ४४ लाख रु पये ठेकेदाराने हडप केले आहेत. तसेच, वेतनाच्या थकबाकीपोटीचे ६ कोटी ४० लाख रु पयेही घशात घातले असल्याचा प्रकार महाराष्ट्र म्युनिसीपल कामगार युनियनचे कामगार प्रतिनिधी महेंद्र हिवराळे यांनी उघडकीस आणला आहे. या कामगारांना अपेक्षित असलेली देणी तत्काळ देण्यात यावीत, अन्यथा, रिपाइं एकतावादीच्या वतीने शहरात कचरा बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपाइं एकतावादीचे नेते तथा माजी स्थायी समिती सभापती भय्यासाहेब इंदिसे यांनी दिला आहे. ठाणे महानगर पालिकेच्या सेवेमध्ये कंत्राटी पद्धतीने सुमारे १ हजार २९९ सफाई कामगार कार्यरत आहेत. त्यापैकी सुमारे ४०० कर्मचारी हे घंटागाडीवर काम करीत आहेत. या चारशे कामगारांना ठेकेदारांकडून कोणत्याही प्रकारच्या सुविधा पुरवण्यात येत नाहीत. या संदर्भात महाराष्ट्र म्युनिसीपल कामगार युनियनने ठामपा प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. या पाठपुराव्यानंतर ठाणे महानगर पालिका प्रशासन तसेच महापौरांनी घंटागाडी कर्मचाऱ्यांना दरवर्षी चांगल्या प्रतीचा गणवेश देण्यात यावा, चप्पल, हातमोजे, मास्क आदी साहित्य पुरवण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी प्रतिकामगार ७ हजार २०० रु पयेही ठेकेदारांना दिले आहेत. गेली पाच वर्षे संबंधीत दोन्ही ठेकेदारांनी हे पैसे पालिकेकडून घेतले आहेत. या पैशांची रक्कम आता १ कोटी ४४ लाख रु पये झाली आहे. ठाणेकर नागरिकांच्या कराचा हा पैसा ठेकेदाराने स्वत:च्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र, कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची साधने पुरवली नाहीत. ही बाब महापौर मीनाक्षी शिंदे यांना समजल्यानंतर त्यांनी १६ जून २०१७ रोजी बैठक बोलावली होती. त्यानंतर एका ठेकेदाराने कपडे दिले असले तरी अवघ्या आठवड्याभरातच हे कपडे जर्जर झाले आहेत. तसेच, या कामगारांसाठी भविष्य निर्वाह निधी, विमा योजना आदींचीही तरतूद सदर ठेकेदाराने केलेली नाही. त्या शिवाय, या कर्मचाºयांना २४ फेब्रुवारी २०१५ पासून झालेल्या पगारवाढीनुसारही वेतन दिले जात नसून त्याची थकबाकी प्रत्येकी १ लाख ६० हजार रु पये झाली आहे. ४०० कामगारांची ही रक्कम सुमारे ६ कोटी ४० लाखांच्या घरात गेली असून कामगारांना थकबाकीचे वाटप केले जात नाही.दरम्यान, कामगार कायद्याची पायमल्ली करणाºया या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, तसेच, कामगारांच्या समस्यांचे तत्काळ निवारण करावे, अन्यथा, रिपाइं एकतावादी आणि महाराष्ट्र म्युनिसीपल कामगार युनियन ठाणे शहरात कचरा बंद आंदोल छेडेल, असा इशारा इंदिसे यांनी दिला आहे.
ठाणे महापालिकेच्या ठेकेदाराने लाटले घंटागाडी कर्मचाऱ्यांचे कोट्यावधी रुपये, कामगारांचा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 2:02 PM
ठाणे महापालिकेच्या सेवेत घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ठेकेदाराने १ कोटी ४४ लाख हडप केल्याचा आरोप रिपाइं एकतावादीने केला आहे. या विरोधात कचरा बंद आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
ठळक मुद्देवेतनाचे ६ कोटी ४० लाख थकीतअन्यथा कचरा बंद आंदोलन छेडण्याचा रिपाइं एकतावादीचा इशारा