सुरेश लोखंडे / ठाणेठाणे जिल्हा सत्र न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ठाणे व पालघर जिल्ह्यांतील सर्व न्यायालयांमध्ये घेतलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात सहा हजार ९७२ प्रलंबित घटले निकाली काढले आहेत. तर, विविध खटल्यांतील १३ कोटी सात लाख ७७ हजार रुपयांची भरपाई व नुकसानभरपाई देणारे दावे मंजूर केले आहेत. या प्रकरणांवरील निर्णयाविरोधात मात्र कोणत्याही पक्षकाराला कोणत्याही न्यायालयात आता दाद मागता येणार नाही.येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक, कामगार, सहकार न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकन्यायालय शनिवारी आयोजित करण्यात आले होते. या दोन्ही जिल्हा न्यायालयांमध्ये विविध स्वरूपांचे प्रलंबित व दावा दाखल होण्यापूर्वीचे ३० हजार ७५६ खटले होते. यातील सहा हजार ९७२ खटले दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने, तडजोडीने व सलोख्याने निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित २३ हजार ७८४ खटल्यांची तडजोड व सहमती पक्षकारांमध्ये होऊ शकली नाही. यामुळे हे खटले अद्याप प्रलंबित आहेत. या राष्ट्रीय लोकन्यायालयांमध्ये सामंजस्याने निकाली काढलेल्या या खटल्यांमध्ये दिवाणी स्वरूपाची, तडजोडीस पात्र फौजदारी स्वरूपाची, वैवाहिक स्वरूपाची, १३८ एनआय कायद्यासंबंधीची (धनादेशांची), मोटार अपघात नुकसानभरपाई, भूसंपादन, वीज व पाणीबिल देयके, इत्यादी स्वरूपाची ही सहा हजार ९७२ प्रकरणे दोन्ही जिल्ह्यांत निकाली काढली आहेत. यामुळे न्यायालयांवरील सुनावणीचा मोठा ताण कमी झाला आहे. तसेच प्रलंबित खटल्यांची संख्याही कमी झाली आहे. याबाबत वकील व पक्षकारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.एन. खेर यांच्या नियंत्रणात दोन्ही जिल्ह्यांतील वकील, लीगल एडचे प्रशिक्षित स्वयंसेवक, समाजसेवक आदींनी परिश्रम घेतले.
ठाणे लोकन्यायालयात ६९७२ खटले निकाली
By admin | Published: February 15, 2017 11:27 PM