ठाणे : एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुलाब हरिश्चंद्र गुप्ता (२१, रा. जुना वाघबीळ गाव, घोडबंदर रोड, ठाणे ) या आरोपीला दहा वर्षांच्या सक्त मजुरीची आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने सुनावली आहे. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षाही आरोपीला भोगावी लागणार आहे.
यातील आरोपीने २४ डिसेंबर २०१६ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास यातील पीडित मुलाला जुना वाघबीळ रोड गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या चिंचेच्या झाडाजवळ गाठले. तो एकटा घरी जात असताना, अंधाराचा फायदा घेत पाठीमागून जबरदस्तीने पकडून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी मुलाच्या पालकांनी कासारवडवली पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला २७ डिसेंबर २०१६ रोजी अटक केली होती. याच खटल्याची सुनावणी २ जुलै रोजी ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात झाली.
सरकारी वकील म्हणून संध्या म्हात्रे यांनी काम पाहिले, तर तपास अधिकारी म्हणून सचिन कोतमिरे यांनी काम पाहिले. सर्व साक्षी पुरावे पडताळल्यानंतर न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ सह पोक्सो कायद्याखाली दोषी ठरवून दहा वर्षे कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार एस. बी. मोहंडकर यांनी काम पाहिले.