बदलापूर - कुळगाव बदलापूर नगर परिषद हद्दीतील तीन तलावांसह अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर लगतच्या ग्रामीण भागातील तीन व मुरबाड तालुक्यातील दोन अशा आठ तलावांच्या संवर्धन व सुशोभीकरण यासाठी मंजूर झालेल्या निधीवरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. खासदार आणि आमदार यांचे समर्थक या निधीवरून श्रेवादाची लढाई लढत आहेत.
दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये तलावांचे खोलीकरण, संवर्धन व सुशोभीकरण करणे या कामांना प्रशासकीय मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिल्याबददल आमदार किसन कथोरे यांचे जाहीर आभार मानणारे फलक तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये कुळगाव बदलापूर नगर परिषद हद्दीतील कात्रप तलावासाठी ४ कोटी ५३ लाख ३३ हजार ६७८ रुपये, ज्युवेली गाव तलावासाठी २ कोटी ८४ लाख ९१ हजार ४८९ रुपये, बदलापूर गाव तलावासाठी २ कोटी ३३ लाख ७९ हजार १०८ रुपये, अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गाव तलावासाठी, देवळोली गाव तलावासाठी व कान्होर गाव तलावासाठी प्रत्येकी अडीच कोटी त्याचप्रमाणे मुरबाड तालुक्यातील बागेश्र्वरी तलावासाठी ५ कोटी व खेडले तळवली गाव तलावासाठी अडीच कोटी रूपये यांचा समावेश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय अंबरनाथ ग्रामीणमधील १० गाव तलावांच्या कामासाठी १० कोटी रुपये, मुरबाड तालुक्यातील ५४ गाव तलावांच्या कामासाठी ५४ कोटी रुपये निधी मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत. मोठ्या तलावांसाठी २४ कोटी ७२ लाख ४ हजार २०५ रुपये निधी मंजूर करण्यात आलेला असून ग्रामीण भागातील तलावानंसाठी ६४ कोटी रुपयांच्या निधीचे प्रस्ताव दाखल करण्यात आले असल्याचेही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. या पोस्टमध्ये ' श्रेय घेणाऱ्यांनो हे घ्या पुरावे असा उल्लेख करून त्याखाली आमदार किसन कथोरे यांनी या कामांच्या मागणीसंदर्भात दिलेल्या पत्रांचे फोटोही दर्शविण्यात आले आहेत. त्यामुळे तलाव संवर्धन सुशोभीकरण कामाचे श्रेय आमदारांचेच आहे, अशा आशयाचा संदेश देणारी ही पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे