- जितेंद्र कालेकर ठाणे - ठाण्यातील वामन शंकर मराठे ज्वेलर्स प्रा. लि. या सोने चांदीचे दागिने असलेल्या दुकानामध्ये चोरटयांनी शटर उचकटून तब्बल साडे सहा किलोचे पाच कोटी ५० लाखांचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना मंगळवारी पहाटे १.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.
नेहमीप्रमाणे या दुकानाचे मालक वामन मराठे हे १७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास नौपाडयातील स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील हे दुकान उघडण्यासाठी गेले. त्यावेळी आपल्या दुकानात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. चोरटयांनी ‘अभिवादन’ बिल्डींगमधील पहिल्या मजल्यावर असलेल्या या दुकानाचे तळमजल्यावरील आणि पहिल्या मजल्यावरील अशी दोन शटर तोडून आत शिरकाव केला. चोरीचा प्रकार पहाटे १.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास घडला. दोन अज्ञात चोरटयांनी दुकानात शिरुन ही धाडसी चोरी केल्याचे सीसीटीव्हीतील चित्रणावरुन स्पष्ट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. नेमकी किती आणि कोणत्या दागिन्यांची चोरी झाली याचा तपशील आणि हिशेब सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात येत होता. त्यामुळेच चोरी झाल्यानंतर उशिरापर्यंत याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.
घटनास्थस्ळी ठाणे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त विनायक देशमुख, ठाण्याचे प्रभारी पोलिस उपायुक्त शशीकांत बोराटे, नाैपाडा विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त प्रियंका ढाकणे आणि नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन आदींनी भेट देऊन पाहणी केली. सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यातील चाेरटयांचा माग काढण्यात येत असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.