भार्इंदर : मीरा रोड येथे भटके कुत्रे व मांजरांची देखभाल करणाऱ्या ‘हार्ट्स’ या संस्थेच्या सदस्यांनी महिनाभरापूर्वी पूनमसागर गृहसंकुल येथील श्वानांच्या नऊ पिलांना उपचारासाठी संस्थेच्याच गोराई येथील केंद्रात नेले होते. त्यानंतर, पिलांच्या आईला उपचार केंद्रात नेताना स्थानिकांनी संस्थेच्या सदस्यांना विरोध दर्शवून त्यांच्याविरोधात नयानगर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.श्वानांच्या उपचारासाठी मुंबईच्या गोराई परिसरात केंद्रही सुरू करण्यात आले आहे. महिनाभरापूर्वी संस्थेच्या सदस्या वैष्णवी भट, श्रेया येदेरी, अल्मास नखुदा यांना मीरा रोड येथील पूनमसागर गृहसंकुल परिसरात श्वानांची नऊ पिले आजारी असल्याचे दिसून आले. त्यातील एका पिलाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी बोरिवली येथील प्राण्यांचे डॉक्टर दवे यांच्या दवाखान्यात नेण्यात आले. तेथे त्या पिलाचा पाय निकामी झाल्याने डॉक्टर दवे यांनी त्याचा पाय कापला.संस्थेने या पिलांची देखभाल करणे सुरू केले. त्यांना आईचे दूध मिळावे, यासाठी ५ जूनला सदस्यांनी पुन्हा गृहसंकुल गाठले. त्यांनी तिला केंद्रात नेण्याचा प्रयत्न केला असता तेथील स्थानिक व श्वानांना खाद्यपदार्थ देणाºया शीतल सावंत, मारिया दंथी, नम्रता, ईदा मुजुमदार यांनी संस्थेच्या सदस्यांना तीव्र विरोध दर्शवून त्या श्वानाला घेऊन जाण्यास मनाई केली.दरम्यान, दोन्ही गटांत वाद झाल्याने त्यांनी संस्थेच्या सदस्यांविरोधात नयानगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. याविरोधात संस्थेने पोलिसांकडे आपली बाजू मांडण्यासाठी अर्ज केला असता तो स्वीकारण्यात आला नसल्याचा आरोप संस्थेच्या अध्यक्षा श्रेया येदेरी यांनी केला आहे.१० जूनला गृहसंकुलातील त्या स्थानिकांनी गोराई केंद्रात येऊन तेथील नऊ पिलांना जबरदस्तीने घेऊन गेल्याने ‘हार्ट्स’ संस्थेने त्यांच्याविरोधात गोराई पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्याचे श्रेया यांनी पत्रकारांना या वेळी सांगितले.परस्परांमध्ये वादयाबाबत नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोन्ही बाजूंकडील नागरिकांमध्ये वाद झाल्याने परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यात श्वानांचा कोणताही संबंध नाही. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
कुत्र्याच्या पिलावर उपचार प्राणिमित्रांना भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 4:22 AM