ठाणे : सध्या ठाणे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची चर्चा सर्वच पातळीवर सुरू आहे. पालिका तात्पुरत्या स्वरुपात मुलामा लावून खड्डे बुजवित असली तरी पुन्हा खड्डे पडत असल्याचे चित्र शहरातील बहुतेक भागात आहे. त्यामुळे तलावांचे शहर असलेल्या शहरांची ओळख ही आता खड्ड्यांचे शहर म्हणून झाली आहे. त्यात आता खड्ड्यांचे ठाणे हेच स्मार्टसिटीचे रडगाणे अशा आशयाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदारपणे वायरल होऊ लागला आहे. परंतु त्यावर उपाय नसल्याने ठाणेकरांनो खड्डे पहा आणि थंड बसा अशी टीकाही पालिका आणि सत्ताधा-यांवर केली जात आहे.दरवर्षी पावसाळा सुरु झाला की शहरातील खड्ड्यांची चर्चा सुरू होते. यंदा तर कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन नंतर शहरातील अर्थव्यवस्था सुरळीत सुरु झाली आहे. परंतु ही अर्थव्यवस्था टप्याटप्याने रुळावर येत असताना शहरातील खड्ड्यांना स्पीड मात्र जोरात असल्याचे दिसून आले. शहरातील कापुरबावडी, माजिवडा, वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा, तिनहात नाका, नितीन कंपनी कॅडबरी आदींसह शहरातील जवळ जवळ प्रत्येक भागात रस्त्यांवर खड्डेच दिसत आहेत. त्यात सध्या ठाणो शहर हे स्मार्टसिटीकडे वाटलाच करीत आहे. परंतु स्मार्टसिटीकडे वाटचाल करीत असताना ठाणेकारांना किमान रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येंतून तरी सोडवा अशी माफक अपेक्षा आहेत. परंतु दरवर्षी येतो पावसाळा तसे दरवर्षी पडतात खड्डे असेच चित्र ठाण्यात आहे. त्यामुळे स्मार्टसिटी कडे वाटचाल करणा-या ठाण्याची खड्ड्यांची वाटचाल सुरू झाल्याचे दिसत आहे.दरम्यान कल्याण डोंबिवलीच्या खडय़ांवरुन मागील काही वर्षे सोशल मिडियावर चांगलीच चर्चा झाली होती. त्यात यंदा ठाण्यातही शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांची चर्चा सोशल मिडियावर सुरु झाली आहे. मागील काही दिवसापूर्वी मनसेच्या वतीने शहरातील खड्ड्यांवर व्हिडीओ वायरल झाला होता. त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये खड्ड्यांचे ठाणे हेच स्मार्टसिटीचे रडगाणे, ठाणेकरांनो पहा आणि थंड बसा, अशा आशयाचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आज अनेकांची पंसती ही ठाण्याला आहे, अनेकांनी आपले घरे येथे घेतली आहेत. सांस्कृतिक, तलावांचे शहर म्हणूनही ठाण्याला पसंती दिली जात आहे. परंतु आज ही ओळख काहीशी पुसली जाऊन खड्ड्यांचे ठाणे अशी ओळख ठाण्याची झाल्याचा आरोप मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून आता तरी प्रशासन जागे होईल का?, खड्ड्यांपासून ठाणेकरांची मुक्तता होईल का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
खड्ड्यांचे ठाणे हेच स्मार्टसिटीचे रडगाणे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 3:16 PM