- अजित मांडकेठाणे - कोल्हापूर, सांगलीबरोबरच ठाणे जिल्ह्यातील कल्याण, बदलापूर, दिवा अशा शहरांना यंदा पुराचा तडाखा बसल्याने दहीहंडीच्या उत्सवावर विरजण पडले आहे. अनेक मंडळे यावेळी थरांची स्पर्धा न लावता बक्षिसाची जास्तीतजास्त रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीकरिता देणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.ठाणे-मुंबईतील बालगोपाळ सांगली-कोल्हापुरातील पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करीत असल्याने त्यांच्या थरांच्या सरावावर पाणी फिरले आहे. ठाण्यातील दहीहंडी उत्सव आयोजकांनीही यंदा साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. दहीहंडीची उंची कमी केली जाणार आहे, तर बक्षिसांची अर्धी रक्कम ही पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय अनेक आयोजकांनी घेतला आहे.येत्या २४ आॅगस्ट रोजी दहीहंडीचा उत्सव असून जगभरातील गोविंदाप्रेमींना ठाणे आणि मुंबईतील गगनाला भिडणाऱ्या हंड्या फोडण्याच्या थराराची प्रतीक्षा असते. या उत्सवात ठाण्यात हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकामध्ये चढाओढ लागलेली असते. गुरुपौर्णिमेपासून गोविंदा पथके सरावाला सुरुवात करतात. यंदा गुरुपौर्णिमा होऊन महिना उलटला तरी अद्यापही पथकांकडून म्हणावा तसा सराव सुरू झालेला नाही. मैदानांत पथकांचा सराव सुरू असल्याचे दिसत नाही. ठाणे, मुंबईत महिनाभरापासून बरसणाºया पावसाच्या सरींनी गोविंदांच्या सरावावर पाणी फिरले आहे.त्यातच सांगली, कोल्हापूर, चिपळूण, सिंधुदुर्ग आदी भागांना पुराचा फटका बसल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना मदत पोहोचवणे गरजेचे असल्याने बहुतांशी गोविंदा पथके जीवनावश्यक वस्तू गोळा करण्याच्या कामात व्यस्त आहेत. अनेक गोविंदांच्या घरांत पाणी शिरल्याने तेही आपला विस्कटलेला संसार सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोकणातील घरांचे पावसाने नुकसान झाल्याने काही तिकडे किंवा कोल्हापूर-सांगलीतील नातलगांच्या मदतीकरिता धावले आहेत. पोलिसांकडूनही अद्याप गोविंदा पथकांना, दहीहंडी आयोजकांना बैठकीसाठी बोलावण्यात आलेले नाही. दहीहंडीच्या थराबाबतचे निर्देश मंडळांपर्यंत पोहोचलेले नाहीत. फक्त काही मोजक्या पोलीस ठाण्यांकडून गोविंदा पथकांना बोलावून केवळ आवाजाच्या डेसिबल्सच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.ठाण्यातील प्रमुख गोविंदा उत्सव आयोजकांनी जिल्ह्यातील व राज्यातील पूरस्थितीचे भान ठेवून यंदा हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे निश्चित केले आहे. काही आयोजकांनी बक्षिसांची रक्कम कमी केली आहे. काहींनी गाव दत्तक घेण्याचे निश्चित केले आहे, तर काही मंडळांना या उत्सवाच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम पूरग्रस्त भागांना द्यायची आहे.काही मंडळांनी पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना रोख रक्कम देण्याचा निर्धार केला आहे. दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे आपले पारंपरिक सण आहेत, त्यामुळे ते साजरे होणेही गरजेचे असल्याचे मत बहुतांश आयोजकांनी व्यक्त केले. परंतु, उत्सवातून सामाजिक भान जपण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.यंदा कोल्हापूर आणि सांगली भागांत जी काही पूरस्थिती निर्माण झाली आहे, त्या अनुषंगाने आम्ही अगोदरच येथील एक गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या गावाच्या उभारणीकरिता दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी अन्य कोणाला आणखी मदत करायची असेल, तर त्यासाठी स्टॉल उभारण्यात येणार आहे. शिवाय, या उत्सवाच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम ही पूरग्रस्त भागासाठी दिली जाणार आहे.- प्रताप सरनाईक,संस्कृती युवा प्रतिष्ठानदहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून यंदा पूरग्रस्त भागांसाठी मदत उभी करण्यात येणार आहे. बक्षिसांची अर्धी रक्कम ही पूरग्रस्तांसाठी दिली जाणार असून कोणतेही कलाकार अथवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाही. तसेच या उत्सवाच्या माध्यमातून जी रक्कम गोळा होईल, ती पूरग्रस्त भागांसाठी दिली जाणार आहे.- शिवाजी पाटील, स्वामी प्रतिष्ठानयंदा हा उत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे. मात्र, थरांची उंची कमी असणार नाही. बक्षिसांची जी काही रक्कम असेल, त्यातील अर्धी रक्कम ही पूरग्रस्त भागांसाठी दिली जाणार आहे. तसेच पूरग्रस्त भागातील १० शेतकºयांना त्या दिवशी आमंत्रण देण्यात आले असून त्यांना प्रत्येकी ५१ हजारांची रोख स्वरूपात मदत दिली जाणार आहे.- अविनाश जाधव,जिल्हाध्यक्ष, मनसे
ठाण्यात साधेपणाने दहीहंडी, बक्षिसांची निम्मी रक्कम देणार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 2:31 AM