- अजित मांडकेठाणे - कळवा-खारेगाव येथील तळ अधिक चार मजली गणदीप इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती असलेल्या रूमला गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा मार करण्यासाठी पाण्याचा पाईप खेचताना आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ओमकार सुर्वे यांच्या हाताला दुखापत झाली आहे. अंदाजे दीड तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. पण, या घटनेत घराचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून ही आग शॉर्टसर्किट झाल्याने लागल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ज्यावेळी आग लागली त्यावेळी घरात कोणी नव्हते. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
गणदीप इमारत या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती असलेल्या रूम क्रमांक १०१ हा वसुंधरा परब याच्या मालकीचा असून तो त्यांनी रोहित पमनानी यांना भाड्याने दिला आहे. त्याच रुममध्ये आग लागली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी टोरंट पॉवरचे कर्मचारी, कळवा पोलिस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी (कळवा प्रभाग समिती), अग्निशमन दलाचे जवान यकानी तातडीने धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू असताना पाण्याचा पाईप ओढताना आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ओमकार सुर्वे (२६ ) यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. तर जवळपास दीड तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या आगीत घराचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी दोन रेस्क्यु वाहनासह,०१-फायर आणि ०१-वॉटर टँकर पाचारण करण्यात आले होते अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.