ठाणे : माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ अर्थात दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. यात ठाणे जिल्ह्याचा निकाल ९३.६३ टक्के लागला. बारावी प्रमाणे दहावीच्या शालांत परिक्षेतही मुलींनीच बाजी मारल्याची स्पष्ट झाले आहे. या परिक्षेत मुलांचा निकाल ९१.९८ तर मुलींचा निकाल ९५.३८ टक्के लागला आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये होती. शुक्रवारी हा निकाल जाहीर करण्यात आला.
दुपारी १२ वाजल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने हा निकाल लागला. काही वेळातच हा निकाल पाहताच उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. ठाणे जिल्ह्यात ११ तालुके असून या तालुक्यांचा एकूण निकाल ९३.६३ टक्के लागला आहे. यात भाईंदर महापालिकेचा सर्वाधीक तर यंदा या निकालात भिवंडी सर्वात मागे असल्याचे दिसून येत आहे. या परिक्षेला एकूण ११११८२ मुले बसली होती पैकी १,०४,१०२ मुले उत्तीर्ण झाली आहेत.