लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमोयकोसिसचे रुग्ण दिवसागणिक वाढू लागले आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्ययंत्रणा अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज झाली आहे. मागील काही दिवसांत दुपटीने रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्यात या आजाराचे २७७ रुग्ण आढळले असून, त्यांतील ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्याची लक्षणे दिसल्यास तत्काळ उपचार करण्याचा सल्ला जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिला आहे. दुसरीकडे, या आजारातून ९२ जण बरे झाले असले तरी यामध्ये १७ जणांना एक डोळा गमवावा लागला आहे.
जिल्ह्यातील २७ रुग्णांना मुंबईतील रुग्णालयात हलविले आहे; तर यातील बहुसंख्य रुग्ण हे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे या आजारावर उपचार करण्यासाठी ठाणे महापालिकेबरोबर जिल्हा रुग्णालयानेदेखील प्रत्येकी एक टीम सज्ज ठेवली आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. या आजाराबाबत आजही नागरिकांमध्ये संभ्रम आहे. परंतु, वेळीच यावर उपचार केले तर तो १०० टक्के बरा होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्या कोरोना रुग्णांवर जास्त प्रमाणात स्टेरॉईडचा वापर झाला असेल, ज्या कोरोनाबाधितांनी जास्त दिवस आयसीयूमध्ये उपचार घेतले असतील, ज्यांना मधुमेहाचा त्रास असेल अशांनाच म्युकरमोयकोसिस आजाराची लागण होण्याची शक्यता अधिक असते. तसेच कोरोनातून बरे झाल्यानंतरही जास्त प्रमाणात वाफारा घेणे अयोग्य असून, त्यामुळे नाकात जखम होऊनही त्याची बाधा होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतर डिस्चार्ज घेण्यापूर्वीच नाकाची तपासणी करण्यास सांगावे, असे आवाहनही डॉक्टरांनी केले आहे. दरम्यान, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात सात जणांची टीम सज्ज आहे. तसेच न्यूरो सर्जनही उपलब्ध करून घेतला जात आहे. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात यासाठी १५ खाटांचा एक वॉर्ड तयार करून तज्ज्ञ डॉक्टरांसह ८३ जणांचा स्टाफ कंत्राटी स्वरूपात घेतला जात आहे.
म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यातील रुग्ण - २७७
मृत्यू - ४६
१७ जणांचा एक डोळा निकामी
या आजाराची पहिली लक्षणे समोर आल्यानंतर रुग्णाला वाचविण्यात यश मिळत आहे. परंतु, रुग्णाकडून उशिराने या आजाराची माहिती झाल्यास त्याला वाचविण्यासाठी एक डोळा काढावा लागतो. त्यानुसार जिल्ह्यात २७७ पैकी जवळजवळ १५६ हून अधिक रुग्णांना डोळ्यांचा त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातूनच आतापर्यंत १७ जणांचा एक डोळा काढावा लागला आहे.
औषधांचा मुबलक साठा
या आजारात शासकीय रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरू असतील तर त्यावर मोफत औषधोपचार केले जात आहेत. त्यासाठी लागणारा औषधसाठा ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पुरेसा असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे; तर ठाणे महापालिकेनेदेखील ही औषधे उपलब्ध करून घेण्यासाठी निविदा काढली आहे.
प्राथमिक लक्षणे
या आजाराची प्राथमिक लक्षणे म्हणजे नाकातून पाणी येणे, सर्दी होणे, नाक दुखणे, नाकावाटे रक्त येणे; तर दुसरे लक्षण डोळ्यांमध्ये दिसून येते. डोळ्यांची नजर हलणे, समोरचे दोन-दोन दिसणे, डोळ्यांची हालचाल थांबणे, डोळ्यांना सूज येणे हे या आजाराचे दुसरे महत्त्वाचे लक्षण आहे. परंतु, त्यानंतर हा आजार डोळ्यांवाटे थेट मेंदूत जात आहे. डोळा आणि मेंदूच्या मध्ये एक अतिशय पातळ थर असतो. तेथून हा म्युकर थेट मेंदूत जाऊन त्यावर हल्ला करतो. त्यामुळे सर्वांत आधी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाने यातील पहिला त्रास जाणवू लागल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे योग्य आहे.
ही घ्या काळजी
हा आजार रोखण्यासाठी सर्वांत प्रामुख्याने कोविड सिव्हीअर रुग्णाने उपचार घेऊन घरी जाण्यापूर्वी नाकाची तपासणी करूनच घरी जावे. त्यानंतर गरम पाण्याचा वाफारा अजिबात घेऊ नये. मिठाच्या पाण्याद्वारे नेजल वॉश करणे, धुतलेल्या रुमालाचा वापर करणे, एसीचे नियमित सर्व्हिसिंग करणे, मास्क प्रत्येकी वेळेस नवीन वापरणे, त्यातही सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांवर स्टेरॉईडचा अतिवापर झाला असेल तर त्यांना शुगर दिसून येते किंवा ज्यांना आधीपासून शुगर आहे, त्यांची ती वाढत जाते. त्यामुळे अशा रुग्णांनी सर्वांत आधी शुगर कंट्रोल करणे गरजेचे आहे. कारण सर्वांत मोठा धोका अशाच रुग्णांना अधिक असल्याचे दिसले आहे. कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये किंवा ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते, त्यांनीदेखील विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
......
ज्या कोरोनाबाधित रुग्णांवर आयसीयूमध्ये जास्त दिवस उपचार झाले असतील, ज्या रुग्णांना स्टेरॉईड्स जास्त प्रमाणात दिले असतील किंवा ज्यांना मधुमेह असेल, अशा रुग्णांना याचा धोका संभवतो. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतर आधी घरी जाण्यापूर्वी नाकाची चाचणी करून घेऊन मगच रुग्णाने घरी जावे. तसेच म्युकरची कोणतीही प्राथमिक लक्षणे दिसून आल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत. पहिल्याच टप्प्यात या आजाराची लक्षणे दिसून आली आणि त्यांकडे दुर्लक्ष केले गेले नाही तर या आजारावर लवकर उपचार होऊन रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.
(डॉ. प्रदीप उप्पल - कान, नाक, घसा तज्ज्ञ)
.......
जिल्हा शासकीय रुग्णालयात अशा प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अनेस्थेशिया, कान, नाक, घसा तज्ज्ञ, आदींची सातजणांची टीम सज्ज ठेवली आहे. तसेच चार ते पाच दंतचिकित्सकदेखील उपलब्ध आहेत. तर बाहेरूनदेखील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम घेतली जाणार असून, न्यूरो सर्जनही उपलब्ध करून घेतला जाणार आहे.
(कैलास पवार - जिल्हा शल्यचिकित्सक - ठाणे)