ठाणे - ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. या बँकेच्या २१ संचालकांसाठी ३० मार्च रोजी मतदान होणार आहे. यासाठी अधिसूचना जाहीर होत असून १४ जानेवारी पासून या राज्यातील सर्वात श्रीमंत बँकेच्या निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे. सहकार क्षेत्रात राज्यातील बँकांमध्ये सर्वात जास्त श्रीमंत बँक म्हणून या टीडीसीसी बँकेची ओळख आहे. २१ संचालकांच्या या बँकेच्या निवडणुकीसाठी उच्च न्यायालयाने ११ जानेवारीला हिरवा कंदील दिल्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने ही निवडणूक घोषित केली आहे. यामध्ये ३० मार्चला मतदान होणार असून तर ३१ मार्चला मतमोजणी होणार आहे. वसईच्या बहुजन विकास आघाडीचे संस्थापक आमदार हितेंद्र ठाकूर यांचे खंद्दे समर्थक राजेंद्र पाटील, हे या बँकेचे विद्यमान अध्यक्ष असून भाजपा पुरस्कृत भाऊ कुर्हाडे उपाध्यक्ष आहे. सध्याच्या या विद्यमान १८ संचालकांवर या बँकेचा कारभार सुरू होता. या संचालक मंडळापैकी उर्वरित अशोक पोहेकर, कृष्णा घोडा आणि अँड. देविदास पाटील या तिन्ही संचालकांचे निधन झालेले आहे. कोरोनामुळे या बँकेची निवडणूक रखडली होती. राज्यातील अन्य जिल्हा बँकांच्या निवडणुकांना राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार या टीडीसीसी बँकेसाठी निवडणूक प्रक्रिया हाती घेतली आहे. हे निवडणूक प्रक्रिया १४ जानेवारी पासून सुरु होणार आहे. मतदार निश्चित करण्यासाठी संस्थांचे ठराव १४ जानेवारी ते २० जानेवारीपर्यंत द्यावे लागणार आहे. त्यानंतर हे ठराव २२ जानेवारीपर्यंत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांना सादर करावे लागणार आहे. त्यानंतर बँकेची प्रारूप मतदार यादी २५ जानेवारी पर्यंत पूर्ण होईल. २७ जानेवारीला ती प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर आक्षेप नोंदवण्यासाठी ५ फेब्रुवारीपर्यंत मुदत राहील. १६ फेब्रुवारी पर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असून नामनिर्देशन पत्रे २६ फेब्रुवारी ते ४ एप्रिल या कालावधीत सादर करता येणार आहे. ५ मार्च रोजी अर्जाची छानणी होणार असून ८ मार्च रोजी उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. २२ मार्च पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. २३ मार्च रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेची निवडणूक जाहीर; ३० मार्चला मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 8:48 PM