लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्यासाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनीही पुढाकार घेतला आहे. परंतू, लॉकडाऊनमुळे पोस्ट विभाग बंद असल्यामुळे कैद्यांना मिळणाऱ्या मनी आॅर्डर मिळू न शकल्यामुळे ही मदत देण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, गेल्या तीन दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गृहविभागाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्हा कारागृहातील सुमारे २०० बंदयांची तात्पुरत्या स्वरुपात जामीनावर मुक्तता केल्याची माहिती सूत्रांनी दिली.देशभरात केरळ नंतर कोरोनाचे सर्वाधिक रु ग्ण हे महाराष्टÑात आढळले आहेत. त्यासाठीच सध्या देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. अनेक उद्योगपतींसह सेलिब्रिटीं तसेच दानशूर व्यक्ती केंद्र आणि राज्य शासनाच्या आवाहनानंतर पुढे सरसावले आहेत. यात अगदी तुरुंगातील कच्चे बंदीही मागे राहिलेले नाहीत. सामाजिक बांधिलकी जपत नाशिक कारागृहातील कैद्यांनी मुख्यमंत्रत्री सहाय्य्यता निधीला मदत केली. त्यापाठोपाठ ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील काही कैद्यांनीही अशाच स्वरूपात मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. प्रत्येक बंद्याला वैयक्तिक खर्चासाठी त्याच्या कुटूंबाकडून कारागृहामध्ये ठराविक रक्कम दिली जाते. ही रक्कम टपाल खात्याकडून मनीआॅर्डर च्या स्वरूपात कारागृहात जमा होते. मागील आठ दिवसांपासून संपूर्ण देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी केल्याने टपाल विभागही बंद आहे. त्यामुळे या मनीआॅर्डर न मिळाल्यामुळे मानसिक तयारी असूनही या बंद्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सध्या तरी मदत करता आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात तीन हजार ९०० विविध गुन्ह्यातील कच्चे कैदी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गंभीर गुन्हे नसलेल्या कच्या कैद्यांना जामिनावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मागील तीन दिवसांत ठाणे कारागृहातून २०० बंद्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. येत्या काही दिवसांत आणखी कैद्यांची येथून जामीनावर मुक्तता होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागील पंधरा दिवसांत ठाणे मध्यवर्ती कारागृहातील शिवणकाम विभागातील पंधरा कैद्यांनी सात हजार मास्कची निर्मिती केली. या तयार मास्कचे तुरु ंग प्रशासनाकडून ठाणे जिल्हा शासकीय रु ग्णालय तसेच ठाण्यातील मनोरु ग्णालयात वाटप करण्यात आले आहे.* दरम्यान, कारागृहातून मुक्त केलेल्या कैद्याना रस्त्यामध्ये पोलिसांकडून विचारपूस झाल्यानंतर काही अडचण निर्माण होऊ नये यासाठी कारागृह ते घरापर्यंत जाण्यासाठी एक विशेष पासही देण्यात आला आहे. याच पासच्या आधारे बुधवारी अनेक बंदी कारागृहातून बाहेर पडल्यानंतर पायी मुंबई तसेच ठाण्यातील वेगवेगळया भागांमध्ये परतले. कारागृहातून बाहेर पडण्यापूर्वी यातील बंद्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.