ठाणे: आपल्यावरील लैंगिक अत्याचाराचा आरोप खोटा असल्याचा दावा करीत कारागृहातच यापूर्वी सुमारे सव्वा महिन्यापासून उपोषण करणा-या हरिश्चंद्र शुक्ला या कैद्याने पुन्हा त्याच कारणासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात उपोषण सुरु केले आहे. न्यायालयानेच आपली दखल घ्यावी, यासाठी उपोषणाचा मार्ग पत्करल्याचा त्याने दावा केला आहे.न्यायालय आणि पोलीस यंत्रणेच्या विरोधात ठाणे कारागृहातच या कैद्याने २ सप्टेंबर रोजी उपोषणास सुरुवात केली होती. त्याच्या उपोषणाची दखल घेत हा खटला फास्ट ट्रॅकवर चालविण्याचे आदेशही जिल्हा सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी दिले होते. त्यानंतर उपोषणाची त्याने सांगता न केल्याने न्यायालयानेही उपोषण मागे घेण्यासाठी त्याला आवाहन केले होते. प्रकृती खालावल्यानंतर रुग्णालयातच औषध उपाचारानंतर त्याने बिनशर्त आपल्या उपोषणाची सांगता केली होती. तो ज्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला होता त्याच शाळेतील एका विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आपल्यावरील आरोप खोटा असून त्याच संदर्भातील डीएनए अहवालही निगेटीव्ह आला आहे. तरीही न्यायालयातून जामीन न मिळाल्याने त्याने आधीही उपोषण केले होते. याच कारणासाठी त्याने आता पुन्हा उपोषण सुरु केल्याने कारागृह अधिकाºयाची डोकेदुखी मात्र पुन्हा वाढली आहे. या संदर्भात कारागृहाचे जिल्हा अधीक्षक नितिन वायचळ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. त्याच्या उपोषणाची माहिती आपण जिल्हा न्यायालयाला तसेच संबंधित यंत्रणेलाही दिली आहे. जामीन मिळणे न मिळणे हा न्यायालयीन प्रक्रीयेचा भाग आहे. शिवाय, कारागृहात आणखीही तीन हजार ३०० कैदी आहेत. या सर्वांचाच न्यायालयीन प्रक्रीयेच्या दृष्टीने विचार करावा लागतो, असेही ते म्हणाले.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायासाठी ‘त्या’ कैद्याचे पुन्हा उपोषण सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 5:21 PM
न्यायालयाने आपली दखल घेऊन जामीन द्यावा, या मागणीसाठी लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या शिक्षक कैद्याने ठाणे कारागृहात पुन्हा उपोषण सुरु केले आहे. त्याने यापूर्वीही याच कारणासाठी ४१ दिवस उपोषण केले होते.
ठळक मुद्देयाआधीही केले होते ४१ दिवस उपोषणलैंगिक अत्याचाराचा आरोप खोटा असल्याचा दावान्यायालयाने दखल घेण्यासाठी वेधले लक्ष