लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंबई येथे चार महिन्यापासून पतीला एका ठेकेदाराने डांबून ठेवले असून जबरदस्तीने काम करून घेत आहेत, अशी तक्रार छत्तीसगड राज्यातील पत्नी राजकुमारी इंद्रपाल सिंग यांनी दाखल केली होती . त्यास अनुसरून छत्तीसगडच्या सुरजपूर जिल्हाधिकारी रोहित व्यास यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी संपर्क साधला. त्यास अतिशय संवेदनशीलतेने व गांभीर्याने घेत त्यांनी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, प्रात, तहसीलदार, शोधपथक आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या सहाय्याने या चार मजुरांची ठेकेदारांच्या तावडीतून आज शिथापिने सुटका केल्याचे उघड झाले आहे.
या घटनेचे सविस्तर वृत्त असे की या छत्तीसगड राज्यातील या वेठबिगारी व्यक्तींच्या सुटकेसाठी प्रारंभी ठाणे जिल्हाधिकार्यांनी अधिक माहिती मिळविण्यासाठी आदिवासी विकास अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना यांचे सहकार्य घेत या व्यक्तींचा मुरबाड, भिवंडी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात शोध सुरू केला. सर्वप्रथम मुरबाड तहसिलदार संदीप आवारे व संबंधित अधिकाऱ्यांमार्फत मोबाईल लोकेशनचा मागोवा घेत प्राथमिक माहितीनुसार मुरबाड परिसरात शोध सुरू केला. परंतु शोध लागत नव्हता. पुन्हा अधिक प्रयत्न सुरू केल्यानंतर मोबाईल लोकेशननुसार त्या व्यक्ती पडघा परिसराकडे स्थलांतरित होत असल्याचे लक्षात आले. थोडाही वेळ न दवडता जिल्हाधिकाऱ्यांनी लागलीच भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप, तहसिलदार अभिजीत खोले, पडघा वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंभार यांना याबाबत तातडीने शहानिशा करून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले.
कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याने त्या व्यक्तींचा शोध घेणे आव्हानात्मक होते. ठिकठिकाणी शोधपथके पाठविली. ज्या ज्या भागात बोअरवेल ची कामे सुरू होती त्यांची माहिती मिळविली. संबंधितांचे फोन लोकेशन पडताळून पाहिले. शेवटी या सर्व प्रयत्नांती नेमकी जागा शोधण्यात यश आले. त्या ठिकाणी इंद्रपाल जगन्नाथ सिंग (३०) ही व्यक्ती काम करताना आढळली. त्याची विचारपूस करताना तो व त्याचे इतर साथीदार विकेश उत्तम सिंग, (१७ ).बादल सोवित सिंग (१४), मनबोध धनि राम,(४९) आदी जिल्हा-सुरजपूर, राज्य-छत्तीसगड हे ठेकेदार- मालक कविन मनिवेल यांच्याकडे बोअरवेल व विद्युत अर्थिंग च्या कामासाठी खड्डे खोदण्याचे काम करीत असत, पुढील कारवाई करण्यात येत आहे.