कल्याण/शहापूर/मुरबाड/टिटवाळा/बदलापूर : दररोज जोरदार कोसळणा-या परतीच्या पावसाने ठाणे जिल्ह्यात हातातोंडाशी आलेले भाताचे पिक झोडपून काढले असून हा कापणीला आलेला भात भुईसपाट होऊन जमिनीला टेकला आहे. त्याच्या ओंब्यांमधील भरलेल्या दाण्यांत पाणी शिरल्याने ते कुजण्याची भीती आहे. काही ठिकाणी कापण्याच्या स्थितीत आलेल्या भाताचे दाणे तुटून पडले आहेत. पावसाच्या कहरामुळे झोडपल्या गेलेल्या शेतकºयांनी ओला दुष्काळ जाहीर करून भरपाई देण्याची मागणी केली आहे. त्यातच हवामान खात्याने अजून आठवडाभर पाऊस बरसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.ठाणे जिल्ह्यातील शेतकरी कितीही अडचणीत आला तरी आत्महत्या करत नाही. पण या पावसाने त्यांच्या वर्षभर खाण्याच्या आणि विक्रीसाठीच्या भाताची नासाडी केल्याने वेगवेगळ््या ठिकाणच्या प्रतिनिधींनी, शेतकºयांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. तशी पत्रे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठवली आहेत. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनीही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट यासह दररोज कोसळणाºया परतीच्या पावसाने शेतात उभी असलेली पिके काही ठिकाणी भुईसपाट झाली, तर काही ठिकाणी जमिनीला टेकली. यंदा उशिरा का होईना, चांगला पाऊस झाल्याने भातशेती करणारा शेतकरी सुखावला होता. हवा तसा पाऊस झाल्याने शेतकºयांनी चांगल्या प्रकारे भातपेरणी केली होती. अपेक्षेप्रमाणे दिवाळीच्या तोंडावर शेतात भाताची पिके डुलू लागली. पण परतीच्या पावसाने पाठ न सोडल्याने आणि तो जोरदार कोसळत असल्याने शेतात उभी असलेली पिके पार झोपली. त्यामुळे भातशेती करणारा शेतकरी हवालदिल झाला. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक भातशेती केली जाते. या एकाच हंगामातील पिकावर अनेक शेतकºयांची वर्षभराची गुजराण होते. त्यामुळे खरीपाचा हंगामच शेतकºयासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे भातशेतीचे नुकसान त्यांना वर्षभराचा फटका देऊन गेले आहे.कल्याण तालुक्यात जवळपास पाच हजार ९०० हेक्टर शेतजमिनीवर भातशेती केली जाते. त्यातून दरवर्षी दोन हजार टन भात पिकवला जातो. झिनी, तोरणा, कर्जत, जया, वाडा कोलम या भाताच्या जातींवर सर्वाधिक भर दिला जातो. वाडा कोलमच्या जवळ जाणारा आणि त्यापेक्षा भरघोस पिक देणाºया गुजरात ११ ची लागवडही मोठ्या प्रमाणात होते.गिरणीतून हा भात पॉलिश करून आणल्यावर त्यातील काही भात वर्षभर घरी खाण्यासाठी आणि उर्वरित विकून त्यांना नगदी उत्पन्न मिळते. भातशेतीतून त्यांच्या दोन्ही गरजा भागतात. पण परतीच्या पावसाने त्याचे सर्व अर्थकारण बिघडले आहे.शेतात उभे असलेले पिक खळ््यात झोडणीसाठी जाण्यापूर्वीच शेतात जमीनदोस्त झाले. त्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याच्या हाती काही लागणार नाही. त्यामुळे कल्याण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी बाजार समितीचे सभापती घोडविंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी लहरी पावसामुळे अडचणीत येतो. त्यामुळे कर्जबाजारी होतो. तेथील शेतकरी आत्महत्या करतात. काही दिवसांपूर्वी शेतकºयांच्या संपानंतर ठाणे जिल्ह्यात पाहणीसाठी शेतकºयांची समिती आली होती. तेव्हा ठाणे जिल्ह्यातील शेतकरी कितीही अडचणीत आला, तरी तो आत्महत्या करीत नाही असे शेतकºयांनी निदर्शनास आणले होते. ठाणे जिल्ह्यातील शेतकºयांना कर्जवाटपच झालेले नाही, असाही मुद्दा समोर आला होता. ओल्या दुष्काळामुळे भातशेती करणारा शेतकरी अडचणीत आल्याने तो आत्महत्या करु शकतो, अशी भीती घोडविंदे यांनी व्यक्त केली.
ठाणे जिल्ह्याला फटका : ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी , पावसाने भातपिके भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 2:28 AM