ठाणे: आगामी गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारने आपली ठोस भूमिका जाहीर करावी आणि उत्सवांचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी महाराष्ट्रातील तमाम गणेशोत्सव मंडळांनी व मूर्तिकारांनी केली आहे. याबाबत ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसे पत्र लिहिले आहे. मागील वर्षाची कोरोना परिस्थिती व या वर्षाची परिस्थिती यामध्ये खूप फरक पडला आहे. यावर्षी लस उपलब्ध झाली आहे. किमान २५% लसीकरण झालेले आहे व राहिलेले ७५% लसीकरण पुढील काही महिन्यात प्रशासन आपल्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पूर्ण करेल. मागील वर्षी गणेशोत्सवाबाबत निर्णय हा खूप उशिरा घेतल्यामुळे मूर्तिकारांचे खूप मोठे नुकसान झाले होते व गणेशोत्सव मंडळांनादेखील खूप त्रास सहन करावा लागला होता. तरी देखील सर्व प्रशासनाच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो होते असे समितीने या पत्रात म्हटले आहे.यावर्षी आपण संपूर्ण मंडळांना विश्वासात घ्याल व मागील वर्षाची बंधने तसेच मूर्तीच्या उंची बाबत असलेली बंधने हटवून हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यास आम्हाला संपूर्ण सहकार्य कराल असा आम्हाला विश्वास आहे असे समितीचे अध्यक्ष समीर सावंत यांनी म्हटले आहे. सर्व गणेशोत्सव मंडळे प्रशासनाला सहकार्य करत आली आहेत आणि पुढेही करत राहतील. तसेच, भविष्यात यदाकदाचित तशीच कोरोनाची गंभीर परिस्थिती उद्धभवलीच तर प्रशाशन व मंडळे मिळून योग्य मार्ग काढतील व संपूर्ण सहकार्य शासनास करून खंभीरपणे आपल्या सोबत उभे राहतील असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.