ठाणे : ठाणे महापालिकेतर्फे ग्लोबल आणि पार्किंग प्लाझा येथे ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारला जात आहे. त्याप्रमाणेच आता ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयही ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प राबविणार आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. या प्रकल्पातून दरराेज २२५ जम्बो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती हाेणार आहे. त्यामुळे येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
मागील काही दिवसांपासून ठाण्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन ही समस्या साेडवण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार ठाणे महापालिका हद्दीत महापालिकेच्या ग्लोबल आणि पार्किंग प्लाझा येथे ऑक्सिजन प्लांट उभारला जात आहे. यातून १५ टन ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार आहे. त्यापाठोपाठ आता ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनानेही असा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे हवेतून प्राणवायूची निर्मिती केली जाणार आहे. एका प्रकल्पासाठी १ कोटी ९० लाख इतका खर्च येणार आहे. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दरराेज १६ टन ऑक्सिजन लागत आहे. या रुग्णालयाला रायगड आणि नवी मुंबईतील रबाळे भागातून टँकरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा होतो. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात ३०० बेड असून, सुमारे २५० च्या आसपास रुग्ण उपचार घेत आहेत. याठिकाणी ३९ आयसीयू बेड असून, २५ व्हेंटिलेटर आणि उर्वरित ऑक्सिजनचे बेड आहेत. त्यामुळे आता जिल्हा शासकीय रुग्णालयाला हा वाढीव ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सिजनअभावी स्थलांतर करण्याची वेळ येणार नाही, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
काेट
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामुळे ऑक्सिजनची टंचाई निर्माण होणार नाही, तसेच ऑक्सिजनअभावी रुग्णांना स्थलांतरित करण्याची वेळ येणार नाही. त्यानुसार आता या प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, ५ मे रोजी हा प्रकल्प सुरू होणार आहे.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे.