ठाणे : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई विचारात घेऊन नदीनाल्यांंतून वाहून जाणारे पाणी वनराई बंधाऱ्यांव्दारे अडवण्यात येत आहे. यासाठी एकही पैसा खर्च न करता सुमारे ३५० बंधारे लोकसहभागातून बांधल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने केला आहे. यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे पुढे येण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी (सीईओ) यांच्यासह अतिरिक्त सीईओ रवींद्र पाटील, डेप्युटी सीईओ अशोक पाटील यांच्यासह जि.प.च्या सात अधिकाऱ्यांनी मुरबाड तालुक्यातील गावपाड्यांत जागृती केली. याशिवाय, जंगलातील ठिकठिकाणच्या बंधाऱ्यांचेदेखील उद्घाटन केल्याचे पाटील यांनी सांगितले.शहापूर तालुक्यातील मुंडेपाड्याच्या रानात गावकऱ्यांनी सुमारे २१ हजार रुपये खर्चाचा बंधारा बांधला आहे. त्यात सुमारे तीन टीएमसी पाण्याचा साठा तयार झाला. याशिवाय, लोकांमध्ये जनजागृती करीत असतानाच स्वत: परिश्रम घेऊन शिक्षक व शिक्षिका बंधारे घालत असल्याचे अंबरनाथचे गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी सांगितले. यानुसार बोराडपाडा केंद्र शाळेच्या नियंत्रणातील शिक्षक व शिक्षिकांनी नंबरवाडीच्या रानात बंधारा बांधला. यामध्ये रामू वाघ, इसामे, नवनाथ अस्वरे, विजय चव्हाण, ज्ञानेश्वर कारोटे, सुनील पाटोळे, पांडुरंग शिर्के (कुडेरान), दखणे, कोळी, जाधव या शिक्षकांसह शिक्षिका जोशी, महाजन, पाटील, पुंडकर, कुसाळकर, सावंत, शेलार, साबळे, बोरसे आदी हा नंबरवाडीचा बंधारा बांधून लोकसहभागास चालना दिली.
लोकसहभागातून ठाणे जिल्ह्यात ३५० वनराई बंधारे
By admin | Published: November 12, 2015 1:21 AM