ठाणे : सध्याच्या घडीला तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात हृदयरोगाचे आजार बळावत असून, त्यामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणातदेखील वाढ होत आहे. असे असताना दुसरीकडे जिल्हा आरोग्य विभागाकडून मात्र, नवजात बालकांसह विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मागील वर्षभरात ० ते १७ वयोगटातील हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या १४७ विद्यार्थ्यांवर हृदय शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली. यामध्ये सर्वाधिक ० ते ६ वयोगटातील ११३ बालकांचा तर, ७ ते १७ वयोगटातील ९४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकीकडे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातदेखील बालकांचे हृदय जपण्याचे बहुमूल्य काम जिल्हा आरोग्य विभाग करीत आहे.
दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आढळत आहे. त्यामुळे इतर आजाराच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड होत आहे. असे असताना राज्य शासनाचा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद आणि जिल्हा शल्यचिकिस्क यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येते. त्यामध्ये विशेषत: जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाडी, खासगी अनुदानित शाळांमधील आणि महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते.जिल्ह्यात ३२ पथके तैनात : यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाने जिल्ह्यात ३२ पथके नेमली आहेत. या एका पथकात एक पुरुष डॉक्टर, एक महिला डॉक्टर, एक नर्स आणि औषधवाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तीन विविध टप्प्यांत बालकांची तपासणी करण्यात येत असते. यामध्ये अंगणवाडी स्तरावर एप्रिल ते सप्टेंबर आणि आॅक्टोबर ते मार्च अशा दोन टप्प्यांत तर, शालेय विद्यार्थ्यांची एप्रिल ते मार्च या एका टप्प्यात आरोग्य तपासणी करण्यात येते. त्यानुसार मागील सहा वर्षांत ० ते १८ या वयोगटातील ८१७ बालकांना हृदयविकार असल्याचे निदर्शनात आले.