लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्हा रुग्णालय आता ५७४ नव्हे तर ९०० खाटांचे होणार आहे. या रुग्णालयात आता सध्या मंजुरी दिलेल्या ३२६ खाटांऐवजी ५०० खाटांचे सामान्य रुग्णालय, २०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय आणि २०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास बुधवारी सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली. ठाण्यातच ह्रदयविकार, मेंदू विकार, कॅन्सर, किडनी विकारांवर उपचाराच्या उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळणे सोपे होऊन उठसूठ मुंबईत जाण्याच्या खेपा वाचणार आहेत. ठाण्यासह पालघर आणि रायगड जिल्ह्यातील रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.
ठाणे सिव्हिल हॉस्पिटलची सध्याची इमारत ही ब्रिटिशकालीन असून १०० हून अधिक वर्षे जुनी आहे; मात्र पुरेशा देखभालीअभावी ती अतिशय जीर्ण झाली असून अनेकदा प्लास्टर, स्लॅब निखळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे या सर्व इमारती पाडून त्या ठिकाणी ५७४ खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यासाठी ३१४ कोटी ११ लाख १० हजार रुपयांच्या खर्चास २०१९ मध्ये मान्यता देण्यात आली होती; परंतु आता कोविड लाटेनंतर उद्भवलेल्या आरोग्य समस्येनंतर सार्वजनिक आरोग्य विभागाने या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ऐवजी ठाण्यात उपरोक्त सुविधा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या नव्या मानकांनुसार नवी इमारत खऱ्या अर्थाने ग्रीन बिल्डिंग राहणार आहे. या इमारतीत सोलार पॉवर सिस्टीमसह रेनवॉटर हार्वेस्टिंग पार्किंग सुविधा, मलनिसारण प्रकल्पांसह अपंगांसाठी विशेष सुविधा राहणार आहेत. या सोबत परिचारिका प्रशिक्षण केंद्राची इमारतही नव्याने बांधली जाणार आहे.
आता या रुग्णालयाचे ५०० ऐवजी ९०० खाटांचे करण्यात आल्याने इमारतींच्या आराखड्यासह सर्वच बाबतीत खर्चास वाढ होणार असून त्यास नव्याने प्रशासकीय मान्यता घ्यावी लागणार आहे, शिवाय वाढीव पदांसाठी आवश्यक वैद्यकीय कर्मचारी पदनिर्मितीसाठी नव्याने मान्यता घ्यावी लागणार आहे.
या राहणार सुविधा
५०० खाटांच्या सामान्य रुग्णालयात ८० खाटांच्या जनरल वाॅर्डसह १० खाटांचा कैदी वाॅर्ड, ४० खाटांचा आयसीयू, ३० खाटांचे ट्रामा केअर युनिट, ७५ खाटांचे सर्जिकल युनिट,२५ खाटांचा बर्न वॉर्ड, ४० खाटांच्या विलगीकरण कक्षासह इतर सुविधा राहणार आहेत.
* असे राहणार महिला व बाल रुग्णालय
या रुग्णालयात ४० खाटांच्या बालरुग्ण कक्षासह १४० खाटांचा प्रसूती व तत्सम उपचाराचा कक्ष राहणार आहे.
* सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असे राहणार.
२०० खाटांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ७० खाटांचा ह्रदयविकारांवरील उपचार कक्ष राहणार असून त्यात प्रत्येकी १५ खाटांचा पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र वॉर्डची सोय आहे. तसेच मेंदू विकारांवरील उपचाराचीही नव्या रुग्णालयात सोय असून त्यासाठी ५० खाटांचा विशेष कक्ष राहणार आहे. विशेष म्हणजे हृदय विकार आणि मेंदू विकाराच्या रुग्णांसाठी आयसीयू युनिटची विशेष सोय आहे. तसेच कॅन्सरवरील अभ्यास, उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी ५० खाटांची सोय राहणार असून डायलेसिस व किडनी विकारांवरील उपचारासाठीचा कक्ष ५० खाटांचा राहणार आहे.
.